भाल्याने वाघाची शिकार, अवयवासह हाडे जप्त; सहाजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 04:19 PM2021-10-17T16:19:14+5:302021-10-17T17:17:36+5:30
किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली.
यवतमाळ : शहरा लगतच्या किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर शनिवारी हे पथक यवतमाळात दाखल झाले. त्यांनी किटा-कापरा जंगलात सर्च घेतला. किटा येथील एका घरातून वाघाची हाडे व इतर अवयव जप्त केले.
रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ बी ५१५२) याची वनविभागाच्या पथकाने झडती घेतली. त्यात आराेपींकडे वाघाची नखे, दात आढळून आले. त्यानंतर वन पथकाने आराेपी प्रकाश महादेव काेळी रा. कामनदेव ता. नेर, प्रकाश रामदास राऊत रा. वरुड ता. बाभुळगाव, अंकुश बाबाराव नाईकवाडे रा. ईचाेरी ता. यवतमाळ, संदीप महादेव रंगारी रा. वर्धा, विनाेद श्यामराव मून रा. सावळा ता. धामणगाव जि. अमरावती, विवेक सुरेश मिसाळ रा. अंजनगाव जि. अमरावती, याेगेश माणिक मिलमिले रा. वरुड जि. अमरावती यांना अटक केली.
या अराेपींनी २०१८ मध्ये उमरडा जंगलात वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. मात्र आराेपींना वन पथकाला खाेटी माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सहायक वनसंरक्षक नरेेंद्र चंदेवार व संदीप गिरी हे पथकासह यवतमाळ शहरा लगतच्या उमरडा जंगलात पाेहाेचले. तिथे त्यांना काही आढळले नाही. दिशाभूल केल्याचे लक्षात येताच वन अधिकाऱ्यांनी आराेपीला वेगळ्या शैलीत चाैकशी केली. तेव्हा त्याने खरी माहिती देत वाघाची शिकार ही हाेळीच्या दरम्यान किटा जंगलात केल्याचे सांगितले.
त्यावरून वन पथकाने किटा हे गाव गाठले तेथे एका घरातून वाघाची हाड व एक नख जप्त करण्यात आला. तब्बल १० किलाे वजनाची हाडं जप्त केली. शिवाय शिकारी सहभागी असलेल्या इतर तिघांनाही अटक केली. त्यांची वन काेठडी मिळविली असून त्याची सखाेल चाैकशी सुरू असल्याचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
वन मुख्यालयाजवळच वाघाची शिकार
वनविभागाचे जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरापासून अगदी काही किलाेमीटर जंगलात वाघाची शिकार झाली. मात्र स्थानिक यंत्रणेला याची काेणतीच खबर मिळाली नाही. शिकारी वाघाला मारून त्याचे अवयव विक्रीत गुंतले हाेते. यावरून स्थानिकची यंत्रणा गाफील असल्याचे दिसून येते. ही शिकार नेमकी केव्हा झाली हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र शहरालगतचे जंगल सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट हाेते.