टिपेश्वर अभयारण्यात वाघ वाढले

By admin | Published: March 21, 2017 12:09 AM2017-03-21T00:09:15+5:302017-03-21T00:09:15+5:30

टिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता ...

The Tiger Reserve in Tippswara Wildlife Sanctuary | टिपेश्वर अभयारण्यात वाघ वाढले

टिपेश्वर अभयारण्यात वाघ वाढले

Next

सुरक्षेच्या उपाययोजनाच नाही : व्याघ्र प्रकल्प घोषित होण्याची प्रतीक्षा
नरेश मानकर पांढरकवडा
टिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता विदर्भातील पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच टिपेश्वर अभयारण्यालाही व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतीकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़
टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतुद केलेली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापुर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही करण्यात आले नाही़ अभयारण्याकरिता विभागीय वन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ परंतु अभयारण्याचा सर्व कारभार पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तिथेच आहे़ पांढरकवडा व घाटंजी तालुक्यात येणारे हे अभयारण्य १४८.२९ चौरस किलोमीटर व्यापले आहे. परंतु एवढ्या मोठ्या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़
नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वनऔषधीही मोठ्या प्रमाणावर आहेत़ १२ ते १४ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर, अस्वल, रानमांजर, नीलगाय, वानरे व इतर प्राण्यांची तसेच विविध प्रकारच्या पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ अनेक ठिकाणी जिवाश्म आढळतात. देशी- परदेशी स्थलांतरीत पक्षीही मोठ्या प्रमाणावर अभयारण्यात येतात. त्यामुळे पर्यटनाची फार मोठी संधीही या ठिकाणी आहे. अभयारण्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे येथील पट्टेदार वाघ. आतापर्यंत अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. या अभयारण्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अनेकदा या शेतात शिरुन वाघांनी गायी व बैलांचा पडशा पाडला आहे. अलिकडच्या गेल्या चार-पाच वर्षात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील चार पट्टेदार वाघांचा मृत्यु झाला़
सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यु झाला, तर बोथ बहात्तर या गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला़ काही दिवसांपुर्वीच एका पट्टेदार वाघीणीच्या शिकारीचा प्रयत्न झाला होता. यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पुर्णत: अपयशी ठरला आहे़ आंध्रप्रदेशाच्या सिमे पर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केल्या जात आहे़

अभयारण्याचा विकासच नाही
१९७७ पासून आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात अभयारण्याचा विकासच झाला नाही. गेल्या काही वर्षात वाघ आणि इतर प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याने टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होणे गरजेचे झाले आहे. पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्य प्राण्यांची व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहेत़ अभयारण्याच्या चारही बाजूला चौक्या असल्या तरी किती चौकीदार उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़. टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकुन १४ बिट आहेत.

Web Title: The Tiger Reserve in Tippswara Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.