अंधारवाडीत तीन दिवस वाघाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:07+5:30
गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील अंधारवाडी शिवारात गेल्या तीन दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्काम असून त्यामुळे परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून पिकांची डवरणी, फवारणी व निंदण आदी कामे सुरू आहेत. यासाठी शेतकरी, शेतमजुरांना दररोज शेतात जावे लागते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ या परिसरात येऊन जनावरांची शिकार करत असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. गेल्या २ ऑगस्टला अंधारवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन शेळ्यांची शिकार करून त्या फस्त केल्या. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.