वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 04:42 PM2022-03-10T16:42:50+5:302022-03-10T16:56:00+5:30
वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला.
वणी (यवतमाळ) : सायंकाळी पाच वाजताची वेळ... शेतातील कामे आटोपून एक शेतकरी आपल्या आई-वडिलांना बंडीत बसवून घराकडे परत येण्यासाठी निघाला. यावेळी बंडीच्या मागे एक तिसरा बैल बांधून होता. बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला.
वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्या वाघाला हुसकावून लावले. शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून वाघाने किंचित माघार घेतली. मात्र, तो तास दीड तास रस्त्यावरच ठाण मांडून होता. मागाहून पुन्हा आलेल्या एका बैलबंडीलादेखील वाघाने अडवून ठेवले. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.
मारेगाव कोरंबी येथील सचिन नागतुरे यांचे वीरकुंड शिवारात शेत आहे. सायंकाळी शेतीचे काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या आई-वडिलांसह बैलबंडीने घराकडे परत येत होते. वीरकुंड शिवारात अचानक त्यांना वाघाने दर्शन दिले. केवळ दर्शनच नाही तर हल्ल्याच्या बेतात असलेल्या या वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन नागतुरे यांनी मोठ्या धैर्याने उभारीचा धाक दाखवत वाघापासून बैलाचा बचाव केला.
वाघ बैलबंडीपासून २० फूट मागे सरकला. त्यानंतर त्याने त्याच रस्त्यावर ठाण मांडले. अर्ध्या तासानंतर नागपुरे यांच्या पाठोपाठ मारेगाव कोरंबी येथीलच संतोष काकडे हेदेखील त्यांच्या पत्नीसह बैलबंडीने याच मार्गे घराकडे परत येत असताना त्यांनाही या वाघाने दर्शन दिले. बैलबंडीपासून हा वाघ केवळ पाच फुटांवर बसून होता. मात्र, त्याने काही केले नाही. सावधगिरी बाळगत संतोष काकडे यांनी आपली बैलबंडी पुढे नेली आणि सुखरूप घर गाठले. या भागात सातत्याने व्याघ्रदर्शन होत असल्याने शेतीच्या कामावर परिणाम होत आहे.
मारेगाव (कोरंबी) भागात सातत्याने वाघाचा वावर
वणी-घोन्सा मार्गावर वणीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव (कोरंबी) शेतशिवारात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील गावकरी कायम दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. एखाद्या भागात वाघ दिसला तर आठवडाभर शेतीची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मारेगाव येथील सरपंचांनी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही.