ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:49 PM2018-09-06T21:49:25+5:302018-09-06T21:49:50+5:30

डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Tigers finally get rid of orders | ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

Next
ठळक मुद्देवनखात्याला बळ : पांढरकवडा, राळेगाव, कळंबला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पट्टेदार वाघीण व तिच्या चार पिलांनी तीन तालुक्यातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. आतापर्यंत या वाघाने डझनावर बळी घेतले. त्यात महिला व पुरुष शेतकरी-शेतमजुरांचा समावेश आहे. ठिकठिकाणी व्याघ्र दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या भीतीपोटी सायंकाळी शेतकरी-शेतमजूर शेतात थांबत नाही. अंधारापूर्वीच घराची वाट धरतात. त्यानंतरही एकट्या-दुकट्याला गाठून वाघ शिकार साधतो आहे. पाठोपाठ शिकारी होत असल्याने नागरिक संतापले आहेत. जीव जात असतानाही वन विभाग काहीच करीत नाही म्हणून नागरिकांचा रोष आहे. वाघाला पकडावे आणि जिल्ह्याच्या हद्दीबाहेर काढावे, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. वन खात्याने ५० ते ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तैनात करून त्या दृष्टीने प्रयत्नही केले. मात्र अद्याप यश आले नाही. अशातच वन्यजीव विभागाच्या नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून पकडा आणि त्यात यश येत नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच जारी केले. त्यावर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आक्षेप नोंदविला. मात्र वन खात्याचा हा आदेश खुद्द नागपूर उच्च न्यायालयानेही गुरुवारी उचलून धरला. न्यायालयानेसुद्धा वाघ बेशुद्ध करून सापडत नसेल तर त्याला ठार मारणेच नागरिकांच्या हिताचे ठरेल, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाची वार्ता वाऱ्या सारखी पसरली. त्यामुळे वाघाच्या दहशतीत असलेल्या पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील नागरिकांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला. या आदेशाने हे नागरिक ‘रिलॅक्स’ झाले आहेत.

नरभक्षक वाघिणीचा थर्मल सेन्सर ड्रोनने शोध
हायटेक मोहीम : झुडपांच्या कापणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : दोन वर्षांपासून वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी सेन्सर ड्रोनची मागणी करण्यात आली आहे. ३०० हेक्टर क्षेत्रात जंगलातील झुडपे कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राळेगाव, पांढरकवडा, कळंब या परिसरात या वाघिणीची दहशत आहे.
सातत्याने वाघिणीच्या हल्ल्यामुळे बळी जात आहेत. १४ जणांना प्राण गमवावा लागला. आता वनविभागाविरोधात प्रचंड जनक्षोभ तयार झाला आहे. वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी शक्य ते सर्वच उपाय अवलंबिले जात आहे. यासाठी मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली आहे. अमरावती येथील शीघ्र कृती दल, नवेगाव, नागजिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष पथक, व्याघ्र संरक्षण दलातील जवानांची तुकडी या सर्वांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. ६० पेक्षा अधिक कर्मचारी वाहनासह वाघिणीचा शोध घेण्यासाठी तैनात केले आहे. वाघपीडित क्षेत्रात शामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जात आहे. क्रियान्वयन व त्यास गती देण्याचे प्रयत्न वनविभाग करत आहे. जंगल पावसामुळे हिरवेकंच असून सात हजार हेक्टर क्षेत्रात २५ पेक्षा अधिक गावे या वाघिणीच्या दहशतीत आहे. विस्तीर्ण क्षेत्रामुळे मोहीम राबविताना अनेक अडचणी येत आहे.

केली गाईची शिकार
वाढोणाबाजार : लगतच्या आंजी येथे वाघाने गाईची शिकार केल्याचे बुधवारी उघडकीस आले. परिसरातील आंजी येथे वन विभागाच्या कंपार्टमेंट ६५३ मध्ये बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता गुराखी गार्इंचा कळप घेवून घराकडे येत होता. कळपावर वाघाने हल्ला केला. यात गाय ठार झाली. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील वेडसी येथे एका गुराख्याला ठार मारले होते. वाघ याच परिसरातील आठमुर्डी शिवारात एका निलगाईचा मृतदेह आढळला. या निलगाईचीही वाघानेच शिकार केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये दहशत आहे.

पट्टेदार वाघिणीचा आधी शोध घेऊन तिला बेशुद्ध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात यश येत नसेल तरच शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजाने तिला ठार मारण्यात येईल. आता उच्च न्यायालयानेही आज त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर)

Web Title: Tigers finally get rid of orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.