मांगुर्डा परिसरात वाघाची दहशत
By admin | Published: January 17, 2015 11:07 PM2015-01-17T23:07:57+5:302015-01-17T23:07:57+5:30
तालुकतील मांगुर्डा परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी वाघाने यादव ठेकाम यांच्या मालकीच्या दोन
पांढरकवडा : तालुकतील मांगुर्डा परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी वाघाने यादव ठेकाम यांच्या मालकीच्या दोन वासरांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्या हल्ल्यात एक वासरू गंभीर जखमी झाले. नंतर १३ जानेवारीला प्रभाकर चिंचाळकर यांच्या शेताजवळ जंगलात चरत असलेल्या वासरावर वाघाने झडप घातली. मात्र वासरू लगेच पळाल्याने गंभीर जखमी होण्याचे टळले. या परिसरात वाघाची दहशत पसरल्यामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे शेतातून सूर्य मावळाच्या आत बाहेर पडण्याचा प्रयत्न होत आहे.
मांगुर्डा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून निसर्गरम्य वातावरण आहे. या जंगलात रोही, हरीण, रानडुक्कर आदी वन्यप्राणी आढळतात. जंगलात शिकार केल्यानंतर पाण्याची सोय म्हणून मुची तलावाला वाघाने आपले आश्रयस्थान बनविले आहे. मुची तलावाच्या आसपासचा परिसर डोंगरदऱ्यांनी व्याप्त आहे. हा परिसर वाघाच्या मुक्कामाला पोषक आहे. दोन दिवसांपूर्वी पट्टेदार वाघ मुची तलावालगतच्या पठारावर फिरत दिसल्याची चर्चा आहे.
वाघाचा मुक्काम परिसरात असल्याने मांगुर्डा ते बोटोणी मार्गावरून ये-जा करणाऱ्या कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगलालगतचे शेतकरी व शेतमजूरही असुरक्षित आहे. सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)