टिपेश्वर अभयारण्यातील वाघ पोहोचला बुलडाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:10+5:30
२५ मार्च रोजी सी-१ व सी-३ या दोन बछड्यांना कॉलरआयडी लावण्यात आला. यासाठी डेहराडून येथील पराग निगम व डॉ.बिलाल हबीब यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या वाघांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला. यातील सी-३ हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून जुलै महिन्यात परत आला. मात्र सी-१ याने आपला प्रवास पुढे सुरू ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघाची संख्या लक्षणीय वाढत आहे. येथील दोन वाघांना कॉलरआयडी बसवून त्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या. यातील सी-१ हा नर थेट दोन राज्य व सहा जिल्हे असा १३०० किलोमीटरचा प्रवास करत पाच महिन्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. त्याच्या या प्रवासाच्या नोंदी वन विभागाने घेतल्या. यासाठी वन्यजीव तज्ज्ञ सातत्याने लक्ष ठेवून होते.
२५ मार्च रोजी सी-१ व सी-३ या दोन बछड्यांना कॉलरआयडी लावण्यात आला. यासाठी डेहराडून येथील पराग निगम व डॉ.बिलाल हबीब यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या वाघांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला. यातील सी-३ हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून जुलै महिन्यात परत आला. मात्र सी-१ याने आपला प्रवास पुढे सुरू ठेवला. तो आदिलाबाद उपविभाग, नांदेड उपविभाग, किनवट, अंबाडी घाट असा प्रवास करत ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पैनगंगा अभयारण्यात पोहोचला. नंतर ऑक्टोबर महिन्यात पुसद उपविभागातील इसापूर अभयारण्यात आला. तेथून काही आठवड्यातच त्याने आपला मोर्चा हिंगोली जिल्ह्याकडे वळविला. या भागात बहुतांश कृषी क्षेत्र असल्याने तो लवकरच वाशिम जिल्ह्यात गेला. नंतर अकोला उपविभागातून नोव्हेंबर महिन्यात त्याने बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केला. चिखली खामगाव या भागात तो १ डिसेंबरच्या दरम्यान आढळून आला. आता तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे. त्याच्या वेळोवेळीच्या हालचालींवर मेळघाट अभयारण्यातील क्षेत्रीय संचालक रमेश रेड्डी यांनी सॅटेलाईट लोकेशनच्या माध्यमातून वॉच ठेवला. आता तो मेळघाट अभयारण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.
संवर्धन मोहिमेला यश
सी-१ वाघाने १३०० किमीचा प्रवासात अनेकदा मानवी वस्त्यांतून मार्गक्रमण केले. मात्र कुठलीही दुर्घटना झाल्याची नोंद नाही. परिस्थितीशी जुळवून घेत तो पुढे चालत राहिला. संवर्धन मोहिमेला यश आल्याचे क्षेत्रीय अधिकारी डॉ.रवीकिरण गोवेकर यांनी सांगितले.