वाघाने घेतला अकरावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:07 PM2018-08-05T22:07:41+5:302018-08-05T22:08:48+5:30
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख्याचे जीव घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव/वडकी : गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख्याचे जीव घेतला. तालुक्यातील हा वाघाचा ११ वा बळी असून वाघाची दहशत प्रचंड वाढली आहे.
गुलाब सदाशिव मोकासी (६०) असे शनिवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तो आपला भाऊ नथ्थू मोकासी याच्यासह शनिवारी गाई चारण्यासाठी जंगलात गेला होता. दोघेही भाऊ ठराविक अंतरावर आपआपल्या गार्इंचा कळप चारत होते. तलावाजवळ गाई आल्यानंतर सायंकाळी ४ वाजता गुलाब कळपामागे दिसला नाही. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. घाबरलेल्या मोठ्या भावाने गाई गावाकडे आणल्या आणि आपल्या भावाला वाघानेच ओढत नेले असावे, अशी शंका गावकºयांकडे व्यक्त केली.
सरपंच अंकुश मुनेश्वर यांच्यासह ग्रामस्थांनी जंगलात शोध सुरू केला. वडकी पोलीस, राळेगावचे तहसीलदार यांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वन विभाग, तहसील कर्मचारी, पोलीस कर्मचाºयांनी शोध घेऊनही गुलाब कुठेच आढळला नाही. शेवटी रविवारी सकाळी ७ वाजता वेडशी जंगलातील लक्ष्मण खोसा परिसरात गुलाबचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला. तहसीलदार हेमंत गांगुर्डे, ठाणेदार प्रशांत गिते, दीपक काँक्रेटवार यांनी पंचनामा केला. सीसीएफ वाघ, वन्यजीव संशोधक डॉ. विराणी यांनी घटनास्थळी भेट दिली.
वन विभागाला विचारला जाब
या परिसरात वाघाच्या हल्ल्यात झालेला हा ११ वा मृत्यू आहे. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले. आणखी किती बळी वाघ घेणार, आमच्या सुरक्षेचे काय, वाघाची शोध मोहीम का बंद केली असे प्रश्न विचारुन ग्रामस्थांनी वन विभागाला धारेवर धरले. मृतदेह वेडशी तलाव परिसरात आणल्यावर ग्रामस्थांनी तेथे मोठी गर्दी केली. वाघाची शोध मोहीम राबविण्याची मागणी केली. तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी लोकांची समजूत घालून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृताच्या मागे पत्नी शकुंतला, एक विवाहित मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
सावरखेडा, लोणी, खैरगावच्या घटना ताज्या
वाघाच्या हल्ल्यामुळे संपूर्ण तालुकाच भयग्रस्त आहे. यापूर्वी सावरखेडा, लोणी, खैरगाव, बंदर आदी ठिकाणी वाघाचे हल्ले झाले. त्यात दहा जणांचे बळी गेले. लोणी येथील घटनेनंतर तर तणावाची स्थिती टोकाला जाऊन नागरिकांनी राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन पेटविले होते. नागरिकांचा रोष वाढूनही वन विभाग आणि प्रशासनाला वाघ पकडण्यात यश आलेले नाही. आता तर वाघाची शोधमोहीम थांबली असून शेतशिवारात कामांची घाई गडबड सुरू आहे. अशा वेळी नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. वेडशी परिसरात एक वाघीण, तिची दोन पिले व आणखी दोन वाघ असल्याची गावकºयांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे राळेगाव, कळंब, पांढरकवडा वनक्षेत्राशी संबंधित २० गावे दहशतीत आहे. गेल्या वर्षी शासनाने वाघीणीला मारण्याचे आदेश दिले होते. मात्र वाघीण गर्भार असल्याच्या कारणावरुन प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयातून स्थगनादेश मिळविला
होता.
दोन किलोमीटर फरफटत नेले
गुलाब मोकासी व नथ्थू मोकासी हे दोघेही तलाव परिसरात गाई चारत होते. मात्र गुलाबचा मृतदेह लक्ष्मण खोसा परिसरात आढळला. त्यावरून वाघाने गुलाबला दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले असावे, असा अंदाज आहे. पोटापासून पायापर्यंतचा शरीराचा संपूर्ण भाग वाघाने खाल्ल्याचे दिसून आले.