यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:22 PM2021-01-04T14:22:11+5:302021-01-04T14:22:24+5:30
उपाध्यक्षपदी संजय देरकर, वसंत घुईखेडकर
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर १६ सदस्य असलेल्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी वणी येथील काँग्रेसचे टिकाराम कोंघरे बिनविरोध निवडून आले. उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर व संजय देरकर यांची वर्णी लागली. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांची सरशी झाल्याचे सांगितले जाते. कारण कोंघरे व देरकर हे दोघेही वणीतील असून धानोरकर यांचे समर्थक मानले जातात.
सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. भाजप समर्थित पॅनलकडून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही अध्यक्ष पदासाठी गेली चार दिवस जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र महाविकास आघाडीत फूट पाडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी नामांकन दाखलच केले नाही. पर्यायाने बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.
अध्यक्ष पदासाठी खासदार धानोरकर यांनी नवा चेहरा द्यावा म्हणून वणीच्या टिकाराम कोंघरे यांचे नाव रविवारपासूनच रेटले होते. सोमवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदाचा र्फाम्युला ठरविण्यात आला.
पहिले तीन वर्ष अध्यक्षपद कोंघरे यांच्याकडे, तर नंतरचे दोन वर्ष मनिष पाटील यांच्याकडे राहील, असे सूत्र ठरविण्यात आले. उपाध्यक्षांची दोन पदे अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीला देण्यात आली. शिवसेनेकडून सुरुवातीला राजुदास जाधव, तर राष्ट्रवादीकडून प्रा. शिवाजी राठोड यांचे नाव निश्चित केले गेले. मात्र दोनही पक्षात अखेरच्या क्षणी चक्रे फिरली आणि दोनही नावे बदलविण्यात आली.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना मुंबईहून फोन आल्याने प्रा. राठोड यांच्याऐवजी उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर यांना संधी देण्यात आली, तर शिवसेनेने राजुदास जाधव ऐवजी वणीच्या संजय देरकरांना संधी दिली. अखेर ठरल्याप्रमाणे बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे, तर उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर व संजय देरकर बिनविरोध निवडून आले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
तब्बल १३ वर्षानंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. २१ पैकी सर्वाधिक १६ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तीन जागांवर भाजप समर्थित पॅनल, तर दोन जागांवर अपक्ष निवडून आले. त्यानंतरही भाजप समर्थित पॅनलच्या एका नेत्याने आघाडीत बिघाडी करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र त्यात त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता दोन स्वीकृत सदस्य (तज्ज्ञ संचालक) आणि राज्य सहकारी बँकेवरील प्रतिनिधीच्या निवडीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. राज्य बँक प्रतिनिधी काँग्रेसचा, तर स्वीकृत सदस्य अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीचा असे ठरले. सेनेकडून नेत्याच्या कौटुंबिक सदस्यालाच स्वीकृत सदस्यपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.