खेड्यातील उर्दू माध्यमाच्या मुलींवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:08+5:302021-01-08T05:36:18+5:30

माध्यमिक शिक्षणाचे वांधे, आठवीनंतर शाळाच नाही

Time to drop education on Urdu medium girls in the village | खेड्यातील उर्दू माध्यमाच्या मुलींवर शिक्षण सोडण्याची वेळ

खेड्यातील उर्दू माध्यमाच्या मुलींवर शिक्षण सोडण्याची वेळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामीण भागात उर्दू विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी घराजवळ शाळाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना अचानक माध्यम बदलण्याची आणि मुलींना तर चक्क शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.


राज्यात जिल्हा परिषदेच्या १७४६, नगर परिषदांच्या २८३ आणि महापालिकांच्या ६४६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश शाळा खेड्यापाड्यात आहेत. तेथे प्राथमिक किंवा फार तर उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे शिक्षण आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण उर्दूतून घेतल्यानंतर अचानक माध्यमिकसाठी मराठी माध्यम घ्यावे लागते. या माध्यम बदलाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलींच्या बाबतीत तर ही परिस्थिती अत्यंत विदारक बनते. खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत सातवी-आठवीपर्यंत उर्दूतून शिक्षण घेतल्यानंतर नववी-दहावीसाठी त्यांना तालुक्याच्या शाळेत जाणे कठीण जाते. अनेक पालक पाठविण्यासही राजी होत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विनाअट नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मंगळवारी मुंबईत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

तीन वर्षांपासून केवळ आश्वासने
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना गेल्या तीन वर्षांपासून ही मागणी लावून धरत आहे. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी तर ‘आठ दिवसात आदेशच निघेल’, असे आश्वासन दिले होते. ते आठ दिवस अजूनही संपलेले नाहीत अन् आदेश काही निघालेले नाहीत. महाविकास आघाडी शासनाने तरी ही अडचण लक्षात घेऊन नववी व दहावीचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Time to drop education on Urdu medium girls in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.