शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:12+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

Time to dry cotton on farmers | शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम। सीसीआय, पणन, खासगी कापूस खरेदी लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके हातची गेली. सुरुवातीला पेरलेला कापूस पावसामुळे ओला झाला. हा कापूस आता सुकविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. आणखी पाऊस आल्यास हाती असलेले छुटपुट पीकही पावसात वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरमध्ये कापूस आहे. कमी जास्त प्रमाणात तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहेत. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचा सोयाबीन गेला. कपाशीवर रोगाचा प्रादूर्भाव आहे. कुठे कपाशीचे झाड वाढले, मात्र त्याला बोंडे नाहीत तर कुठे पावसामुळे बोंडे तडकल्याची स्थिती आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती थोडाबहुत कापूस लागला आहे. मात्र तोही ओला झाला आहे. त्यामुळे सध्या हा कापूस वाळविण्याची मोहीम अनेक गावात पहायला मिळते.
आतापर्यंत सुरू असलेला पाऊस व पुन्हा पावसाची चिन्हे असल्याने यावेळी विक्रीसाठी येणारा कापूस ओला राहू शकतो, याचा अंदाज खरेदीदारांना आला आहे. त्यामुळेच अद्यापही खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. खेडा खरेदी यावेळी लांबण्याची व आॅक्टोबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाकडून सीसीआय, पणन महासंघामार्फत हमी भावानुसार होणारी कापूस खरेदी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. शासनालाही विक्रीसाठी ओला कापूस येण्याची भीती असावी, त्यामुळेच की काय शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ लांबणीवर टाकला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

मृग नक्षत्रात पेरलेला कापूस आला घरात
कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील २० ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात मृगनक्षत्रात सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणी होऊन घरात आला आहे. या काळात पाऊस झाल्याने हा कापूस ओला झाला. पर्यायाने अनेक गावात घरासमोर ओला झालेला कापूस सुकविण्यासाठी उन्हात वाळू घातल्याचे हे चित्र जिल्ह्यात सर्वदूर पहायला मिळते.

Web Title: Time to dry cotton on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.