यंदा ‘बाप्पा’च्या किंमती जैसे थे
By admin | Published: September 1, 2016 02:35 AM2016-09-01T02:35:11+5:302016-09-01T02:35:11+5:30
मागील वर्षी गणेश स्थापनेच्या दिवशीच वणी परिसरात पावसाने थैमान घातले. परिणामी मूर्तींचे नुकसान झाले,
पावसाची भीती : पीओपीच्या मूर्तींचा स्थानिक मूर्तीकारांना फटका
वणी : मागील वर्षी गणेश स्थापनेच्या दिवशीच वणी परिसरात पावसाने थैमान घातले. परिणामी मूर्तींचे नुकसान झाले, तर अनेक मूर्ती विकल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे यंदा येथील मूर्तीकारांनी मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ केली नसून मागील वर्षीच्याच किंमतीत मूर्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणीत मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वीपासूनच स्थानिक मूर्तीकार कामाला लागलेत. मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी मूर्तीकारांच्या मनात पावसाची धास्ती आहे. मागील वर्षी शहरात मूर्ती विक्रींची दुकाने लागली होती. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अनेक मूर्ती जागेवरच विरघळल्या, तर काही मूर्तीकार मूर्तींना पावसापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे त्या मूर्तीदेखील शिल्लक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वणी परिसरात पावसाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात पावसाची शक्यता असते. त्यामुळे यावर्षी मूर्तीकार ठराविक संख्येतच मूर्ती बनवित आहेत. किंमतीही मागील वर्षी एवढ्याच ठेवल्या आहेत.
दरवर्षी स्थानिक मूर्तीकारांपुढे पीओपी मूर्तींचे संकट असते. अमरावतीसह अनेक शहरातून येथे गणेशोत्सवासाठी दोन हजारांवर मूर्ती येतात. आकर्षक रंगामुळे भाविक या मूर्तींकडे आकर्षित होतात. मुळात या मूर्ती पर्यावरणासाठी घातक आहेत. या मूर्तीमुळे जलप्रदूषण होते. मात्र याबाबत ना भाविक गंभीर आहेत, ना प्रशासन. त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रेत्यांचे चांगलेच फावत असून त्याचा फटका स्थानिक मूर्तीकारांना बसत आहे. खरे तर या मूर्ती शहरात विकल्या जाऊ नये, किंवा भाविकांनी त्या घेऊ नयेत, यासाठी जागृती आवश्यक असते.
त्याची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे. मात्र नगरपालिका किंवा पालिकेचे कोणतेही पदाधिकारी या विषयात गंभीर नसल्याचे दिसून येते. गणेशोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला असला तरी नगरपालिकेकडून यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही वणी पीओपी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील मूर्तीकार अतुल घोटेकर, विनोद घोटेकर यांच्यासह स्थानिक मूर्तीकारांनी पीओपीच्या मूर्तीसंदर्भात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून पीओपीच्या मूर्ती विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
स्थानिक मूर्तीकार मूर्ती तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. दरवर्षी बेलोरा खाणीतून उत्खनन झालेल्या मातीच्या ढिगाऱ्याच्या बुडाशी साचलेली मऊ माती मूर्तीसाठी वापरली जाते. त्यासाठी प्रत्येक ट्रॅक्टरमागे दोन हजार रुपये मूर्तीकारांना मोजावे लागतात. या मातीवर पुढे प्रक्रीया करून मग गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदर मूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)
रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण
पीओपी मूर्ती तयार करण्यासाठी सर्रास आॅईल पेन्टचा वापर केला जातो. मुळात विसर्जनानंतर पीओपीची मूर्ती विरघळत नाही. त्यावरील रंग मात्र हळूहळू पाण्यात मिसळतो. या रंगाचे तवंग पाण्यावर तरंगतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. मातीच्या मूर्तीसाठी वॉटर कलरचा वापर केला जातो. मातीची मूर्ती पाण्यात विरघळत असताना त्याचे रंगही त्या मातीसोबत वाहून जातात. त्यामुळे जलप्रदूषण होत नाही.