शेतकऱ्यांवर सुपीक माती विकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:47 PM2018-01-21T23:47:47+5:302018-01-21T23:48:00+5:30
आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे.
सदानंद लाहेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिजोरा : आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत अनेक विटभट्टीचालक कमी दराने माती खरेदी करीत आहे.
महागाव तालुक्यावर गत पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी अपूूऱ्या पावसाने शेती उद्धस्त होत आहे. दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी अनेक घर खर्चासाठी अनेक शेतकºयांनी आपल्याकडील दागदागिणे विकले आहे. अनेक शेतकऱ्यांजवळ आता विकायलाही काहीच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काळ्या आईची सेवा करणाºया शेतकºयावर शेतातील माती विकण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरातील अनेक शेतकरी विट भट्टीचालकांना माती विकत आहे. शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेत अनेक माती वाहतूक करणारे ठेकेदार तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माती विकत घेऊन विट्टभट्टी चालकांना ज्यादा दरात विकली जात आहे. हा प्रकार सर्रास सुरु असून नाईलाजाने माती विकावी लागत आहे.
शेतात निर्जीव माती शिल्लक
आर्थिक विपन्नावस्थेमुळे शेतकरी आपल्या शेतातील माती विकत आहे. विटभट्टी चालक शेतातील सुपिक मातीचा वरचा थर घेऊन जात आहे. त्यामुळे निर्जिव माती शेतात शिल्लक राहते. या मातीत कोणतेही अन्नद्रव्य राहात नसल्याने पीक येण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.