शेतकºयाच्या मुलावर मंदिरात राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:43 PM2017-09-18T21:43:50+5:302017-09-18T21:44:07+5:30
मंदिरातली एक खोली.. सर्वत्र सायन्स विषयाची कात्रणे चिकटवलेली... तारावर मळलेला टॉवेल, .....
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंदिरातली एक खोली.. सर्वत्र सायन्स विषयाची कात्रणे चिकटवलेली... तारावर मळलेला टॉवेल, फाटलेला शर्ट.. खाली तरटपट्टी... त्यावर १६ वर्षांचा प्रवीण पुस्तकात मान खुपसून अभ्यास करत बसलेला... पोटात भूक, मनात आग.. तरी डोळ्यात स्वप्न..!
बारावी विज्ञान शाखेत शिकणाºया प्रवीणला राहण्यासाठी साधी एक खोली मिळू शकलेली नाही. मेसचे पैसे नाही.. ड्रेसची सोय नाही.. तरी बारावीची परीक्षा तो उत्तीर्ण होणारच, पण तत्पूर्वी परिस्थिती रोज त्याची परीक्षा घेत आहे आणि तो रोज उत्तीर्ण होत आहे. प्रवीण रामदास राठोड नावाचा हा विद्यार्थी म्हणजे व्यवस्थेच्या गालफाडात मारलेली चपराकच.
त्याचे मूळगाव आंबेझरी (ता. घाटंजी) तेथून पायी चालत तो मोहद्याच्या (ता. पांढरकवडा) शाळेत दहावीपर्यंत शिकला. दीड एकराच्या कास्तकाराच्या पोटी जन्म झाला.. घरी मीठ आहे तर चटणी नाही, चटणी मिळाली तर तेल नाही, अशी कफल्लक अवस्था... तरीही दहावीत प्रवीणने ८७ टक्के गुण पटकावले. आता वडीलांची इच्छा असली तरी शिकवण्याची ताकद नाही. हे ओळखूनच त्याने यवतमाळच्या गोदनी रोडवरील शासकीय शाळेत अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला. तेव्हा समाजकल्याणच्या वसतिगृहासाठीही त्याने अर्ज केला. ८९ टक्क्यांवर लिस्ट क्लोज झाली. ८७ टक्केवाला प्रवीण निराश्रित झाला. तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांना भेटूनही उपयोग झाला नाही. आमदार राजू तोडसाम यांचे शिफारसपत्र देऊनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. समाज कल्याण आयुक्तांनाही भेटला. शेवटी बळीराजा चेतना अभियानातून लाभ होईल म्हणून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचीही भेट घेतली. पण शाब्दिक दिलाशाविना काहीच मिळाले नाही.
मानवता मंदिरात आसरा मिळालेल्या प्रवीणचा एकाही विषयाचा कोचिंग क्लास नाही. आमच्या शाळेतले सरच छान शिकवतात, तेच पुरेसे आहे, असे तो सांगतो. अनिकेत गोर्लेवार या मित्रानेच बारावीची जुनी पुस्तके दिली. स्वत:ची जुनी सायकलही दिली होती, ती चोरीला गेली. एक शाळेचा व एक घरचा असे दोनच ड्रेस. घासून चोपडी झालेली चप्पल. फक्त रक्षाबंधनाला तो एकदाच गावाकडे जाऊ शकला. मेसवाल्याचे दोन महिन्यांपासून पैसे थकले. मंदिरातील वीजबिलाचेही देऊ शकला नाही. गावाकडे वडील रामदास आणि आई सुनिता इतरांच्या शेतात रोजमजुरी करून प्रवीणला पैसे पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विवेकानंदांना आदर्श मानणाºया प्रवीणला डॉक्टर व्हायचे आहे.
पण हे सांगताना आज त्याचा आवाज कृश होतो. ‘काही बोलायाचे आहे.. पण बोलणार नाही... देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही..’ कवी कुसूमाग्रजांचे हे शब्द प्रवीणच्या संघर्षाची वाचा बनले आहेत.
अखेर तबल्याच्या कलेने दाखविला मार्ग
अखेर प्रवीणची अंगभूत कला मदतीला धावून आली. तो लहानपणापासून गावात भजनांमध्ये तबला वाजवायला जायचा. गावातल्या बाल श्रीगुरुदेव मंडळाचा तो अध्यक्षही झाला होता. हाच संदर्भ घेऊन तो शिवनेरी सोसायटीतील मानवता मंदिरात गेला. तिथल्या व्यवस्थापकांना आपबिती सांगितली. शेवटी वीजबिल भरण्याच्या अटीवर प्रवीणला मंदिरातली एक खोली देण्यात आली. तिथे राहताना प्रवीण मंदिराच्या स्वच्छतेत हातभार लावतो. प्रचंड संघर्षातही त्याने ७५ टक्के गुणांसह अकरावी उत्तीर्ण केली. यंदा बारावीची तयारी सुरू आहे.