टिपेश्वरला २४ लाख वनविकास निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:19 PM2018-10-11T22:19:37+5:302018-10-11T22:19:53+5:30
पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला लागून टिपेश्वर अभयारण्याची हद्द आहे. पांढरकवड्यापासून सुरू होणारे हे अभयारण्य पुढे उमरखेडला पैनगंगा अभयारण्याला मिळते. टिपेश्वर अभयारण्यात दुर्मिळ पशुपक्षांसोबतच पट्टेदार वाघाचेही अस्तित्व आहे. या व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने टिपेश्वरमध्ये जातात. मात्र तेथे पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याअंतर्गत तेथे मचान, हट, वाहने, गेस्ट हाऊस, कॅन्टींग, रस्ते आदी सोईसुविधांची आवश्यकता आहे. त्याच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाने इको टुरिझम अंतर्गत २४ लाख ६९ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यातून विकास कामांना सुरुवात होणार आहे. आणखी निधी टिपेश्वरच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
एकीकडे अभयारण्याबाहेर पट्टेदार वाघिणीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. १४ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केलेल्या या वाघिणीला जीवंत अथवा मृत पकडण्यासाठी वन विभाग दोन महिन्यांपासून शर्तीचे प्रयत्न करतो आहे. मात्र अद्याप त्यात यश आले नाही. तर दुसरीकडे वाघाला पाहण्यासाठी टिपेश्वरमध्ये गर्दी होते.