टिपेश्वर अभयारण्याची क्षमता चारच वाघांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 09:41 PM2018-12-20T21:41:30+5:302018-12-20T21:44:02+5:30
पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे.
नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली. म्हणून या वाघिणीला हैदराबादच्या नवाब या एक्सपर्ट शिकाऱ्यामार्फत गोळी घालून ठार मारण्यात आले. या निमित्ताने व्याघ्र संख्या व अभयारण्याची क्षमता हा मुद्दा पुढे आला आहे.
सूत्रानुसार, पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाºया टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १४८.६३ चौरस किलोमीटर एवढे आहे. या अभयारण्यात जास्तीत जास्त चार ते पाच वाघ राहू शकतात. प्रत्येक वाघाला किमान १० चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. हे क्षेत्र वाघ स्वत: निश्चित करते. या क्षेत्राच्या चहूबाजूला तो लघवीने सीमा ठरवितो. मग त्या सीमेत दुसरा वाघ प्रवेश करीत नाही. अवघ्या चार ते पाच वाघांची क्षमता असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये नऊ ते दहा वाघ असल्याची नोंद वन खात्याच्या दप्तरी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या भागातील वाघांचा हा आकडा १३ ते १४ असल्याचे वन यंत्रणा खासगीत सांगते. क्षमतेच्या सुमारे तीन पट अधिक वाघ असल्याने टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र या वाघांना कमी पडते. त्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर आले असून पांढरकवडा वन विभागाचे जंगल तसेच त्याला लागून असलेल्या रहिवासी वस्त्या-गावे आणि शेतशिवारांमध्ये या वाघांचा वावर वाढला आहे. त्यातच शिकारीसाठी वन्यप्राणी मिळत नसल्याने हे वाघ हिंसक झाले असून मानवी वस्त्यांवर हल्ले करू लागले आहे. वाघांनी केलेल्या हल्ल्यात पांढरकवडा वन क्षेत्रांतर्गत आतापर्यंत १३ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला आहे. मात्र या सर्व १३ शिकारी एकाच वाघाने केल्या का याबाबत वन खात्यातच साशंकतेचे वातावरण आहे.
वन खात्याने नवाब पिता-पुत्रामार्फत अवनीला गोळी घालून ठार केले असले तरी तिचे दोन बछडे आता मोठे झाले आहेत. त्यांना शिकारही करता येत आहे. याशिवाय एक आणखी मोठा वाघ त्यांच्यासोबत आहे. या वाघ व बछड्यांची दहशत तीनही तालुक्यात कायम आहे. त्यामुळे आजही शेकडो हेक्टर जमीन पडिक आहे. लोक जागलीला जायला, शेतात जायला जीवाच्या भीतीने घाबरत आहेत. वन खात्याची यंत्रणा अनेकदा शेती पडिक असल्यामागे वनजमिनीवरील अतिक्रमण हे ठेवणीतील कारण पुढे करते. मात्र प्रत्यक्षात वाघाची दहशत हेच कारण असल्याचे आढळून आले आहे. वन्यजीव खात्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र किती, क्षमता किती, प्रत्येक वाघाला लागणारे क्षेत्र किती, तेथे रेकॉर्डवर पट्टेदार वाघांची नोंद किती आणि प्रत्यक्षात किती वाघांचे अस्तित्व आहे, याबाबी तपासल्यास १३ शेतकरी-शेतमजुरांच्या शिकारी मागील ‘वास्तव’ उघड होण्यास वेळ लागणार नाही.
वन खात्याचे वर्षानुवर्षे दुर्लक्ष
क्षमतेपेक्षा अधिक असलेल्या वाघांना वन्यजीव विभागाने बेशुद्ध करून व पकडून इतरत्र हलविणे अपेक्षित आहे. मात्र वाघांची संख्या प्रचंड वाढली असतानाही वन खात्याने गेली कित्येक वर्ष या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच पांढरकवडा वन विभागातील तीन तालुक्यातील १३ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागल्याचे मानले जाते.