टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:20 PM2018-12-02T22:20:07+5:302018-12-02T22:20:38+5:30
तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.
नरेश मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात १४ पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून यामध्ये एक नर वाघ, चार वाघिण आणि नऊ बछड्यांचा समावेश आहे. अभयारण्यात याशिवाय रोही, रानगायी, मोर, लांडोर, सांबर आदी विविध प्राणीसुद्धा या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. नैैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या व १५ हजार हेक्टरचा विस्तीर्ण परिसर असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने संपूर्ण विदर्भातील पर्यटक या अभयारण्यात सफारीसाठी येत आहेत. सफारी करताना वाघासह अनेक प्राणीसुद्धा पहावयास मिळत असल्याने पर्यटक आनंदून जात आहेत. दक्षिण विदर्भात एकमेव असलेल्या या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. यादृष्टीने सर्वस्तरातून प्रयत्नदेखील सुरू आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील क्षेत्र हे वाघाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे व सुरक्षित असे क्षेत्र आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या अभयारण्यात पर्यटकांना सफारी करताना सोयीचे जावे, यासाठी अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी मेनगेटपासून व मादनी गेटपासून जीप्सी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत.
सफारीसाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. टिपाईदेवी मंदिर परिसर, विविध पाणवठे, पिलखान नर्सरी या भागात आतापर्यंत अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघांची संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना आणखी आवश्यक सोईसुविधांची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींना वाटते.
अभयारण्य मानवी हस्तक्षेपापासून दूर
टिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गावातील रहिवासी वाघाच्या अधिवासात हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे या भागात वाघ व मानवामध्ये संघर्ष होताना दिसत नाही. प रंतु अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघिणींचे बछडे आता मोठे झाल्यामुळे ते जंगलाबाहेर निघू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.