टपरीचालकाचा मुलगा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:54 AM2017-10-23T00:54:36+5:302017-10-23T00:54:47+5:30
येथील एका पानटपरी चालकाच्या मुलाची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून तो या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील एका पानटपरी चालकाच्या मुलाची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून तो या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. अथर्व नीलेश मुंडे असे या खळाडूचे नाव आहे.
वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अथर्वने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले. धनुर्विद्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर जाणारा अथर्व हा जिल्ह्यातील पहिला आणि सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. तो स्थानिक लक्षवेध क्रीडा अकादमीचा विद्यार्थी असून ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिकतो. महाराष्ट्रातून आलेल्या नऊ वर्षे वयोगटातील २०० स्पर्धकांमध्ये त्याने अव्वल स्थान प्राप्त केले. आता आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे होत असलेल्या धनुर्विद्या स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांनी मार्गदर्शन केले.
अथर्वची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून वडिलांच्या पानटपरीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पवार, मुख्याध्यापक शानौजकुमार, प्राचार्य सैयद अनिस, जीवन कांबळे, खुशवंत राठोड, पवन ढोरे, अजय राठोड, म. खान यांनी त्याचे कौतुक केले आहे.