पर्यटकांना खुणावतेय टिपेश्वर अभयारण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:11+5:30
वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले.
प्रवीण पिन्नमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : वाघाच्या वाढत्या संख्येने टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांना खुणावत आहे. या अभयारण्यात वाघांचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने अतिशय पोषक वातावरण असल्याने भविष्यात हे अभयारण्य वाघ्रप्रकल्प म्हणून नावारूपास येणार आहे.
केळापूर तालुक्यात टिपेश्वर नावाचे गाव होते. या गावात तिपाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. तिपाई देवीच्या नावावरून या अभयारण्याला टिपेश्वर असे नाव देण्यात आले. केळापूर आणि घाटंजी तालुक्यातील या अभयारण्याचा १४८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तार आहे. वाघांची संख्या लक्षात घेता, आता या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. अभयारण्याच्या वाटेवर केळापूर येथे जगदंबा देवीचे आणि चतुर्मुखी गणेशाचे अतीप्राचीन मंदिर आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अभयारण्याच्या जवळून जातो.
टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या वास्तव्यशिवाय बिबट, हरीण, काळवीट, मोर, नीलगाय, रानडुकर याशिवाय विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश तेलंगणापर्यंत या अभयारण्याची सीमा आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे.
वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले. येत्या काही दिवसांतच टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे एका जाणकाराने ‘लोकमत’ ला सांगितले. त्यासाठी व्याघ्र गणना सुरू झाली आहे.
अभयारण्यासाठी दोन गावांचे पुनर्वसन
१ एप्रिल २०१४ ला पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातील बाधित गावांपैकी टिपेश्वर गाव व मारेगाव (वन) या दोन गावांची पुनर्वसनाची प्रक्रिया पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने ३ नोव्हेंबर २०१२ मध्ये पार पाडली. अलिकडे या अभयारण्यात वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.