तूर खरेदी, कर्जमाफी, दारूबंदीसाठी ठिय्या
By admin | Published: March 21, 2017 12:05 AM2017-03-21T00:05:25+5:302017-03-21T00:05:25+5:30
जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी स्वामिनी जिल्हा दारूमुक्त अभियानाच्या पुढाकारात शेकडो महिलांनी सोमवारी जोडमोहा येथे रास्तारोको आंदोलन केले.
‘स्वामिनीं’नी केला शासनाचा निषेध : अखेर बाभूळगावात तूर खरेदी, घाटंजीत सातबारा कोरा करण्याची मागणी
यवतमाळ : जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी स्वामिनी जिल्हा दारूमुक्त अभियानाच्या पुढाकारात शेकडो महिलांनी सोमवारी जोडमोहा येथे रास्तारोको आंदोलन केले. जिल्हा दारूबंदी कराच, असे नारे देत महिलांनी महामार्गावरच पोलीस प्रशासनालाही धारेवर धरले.
स्वामिनी अभियानाच्या महिला तसेच युवकांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास जोडमोहा ग्रामपंचायत येथे जाहीर सभा झाली. यावेळी अभियानाचे मुख्य संयोजक महेश पवार, तंटामुक्तीचे देवानंद रामटेके, कळंब तालुका संयोजक मनिषा काटे, प्रशांत भोयर, ग्रामपंचायत सदस्य कैलास लिल्हारे, अशोक उमरतकर, राळेगाव तालुका संयोजक बालाजी कदम, शेखर सरकटे, गणेश कुक्कुलवार आदी उपस्थित होते.
सभा संपल्यानंतर सर्व महिलांनी दारूबंदीचे नारे लावत राज्य महामार्ग क्रमांक १४ अडवून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. रस्त्यावर लोटांगण घेऊन महिलांनी वाहतूक अडविली. बघ्यांचीही मोठी गर्दी उसळली होती. भाजपा सरकार जनतेच्या हिताचे नसून दारू व्यावसायिकांची पाठराखण करणारे आहे. असे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, असा आक्रोश या महिला करीत होत्या. एक नारी, सब पर भारी, जिल्हा दारूबंदी अशी कशी होत नाही, केल्याशिवाय राहात नाही अशा घोषणांनी जोडमोहा परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
नायब तहसीलदार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यवतमाळ ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक धंदरे यांनी पुढे येऊन महिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. काही महिलांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. या आंदोलनात महेश पवार यांच्या नेतृत्वात मनिषा काटे, प्रशांत भोयर, नाना रामटेके, नितीन राऊत, जयमाला बोेंद्रे, शशिकला रंजीत, अंजिरा लिल्लारे, रंजना सहारे, कांता मेश्राम, मनिषा शिंदे, शकुंतला रामपुरे, रंजना कासार, प्रभा सहारे, लता शेंदरे, सुलोचना मुडे, लक्ष्मी भगत, शालू मानकर, मंदा चौधरी, स्वाती चंदनकर, अंबिका सहारे, सपना चांदेकर आदी माहिला सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
घाटंजीत शिवसेनेचा रस्ता रोको
घाटंजी : श्ोतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. त्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मागणीसाठी तालुका शिवसेनेने सोमवारी यवतमाळ मार्गावरील खापरी फाटा रोडवर रास्ता रोको केला. यामुळे दोनही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, शहर प्रमुख मनोज ढगले, प्रशांत धांदे, प्रशांत मस्के, आकाश राठोड, संतोष धेनावल, आसिफ सैयद, असलम कुरेशी, सागर पवार, संदीप जाधव, संदीप बोबडे, नथ्थू महात, अजय रुईकर, मिलिंद राठोड, राहुल आडे, बालू पवार, नरेश चव्हाण, प्रदीप खोब्रागडे, गजानन बावने, विकास नैताम, विनोद चव्हाण, पवन साखरकर, अमोल तरेकार आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
बाभूळगावात तीन तास वाहतूक ठप्प
बाभूळगाव : नाफेडतर्फे सुरू असलेली तूर खरेदी मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ-धामणगाव रस्त्यावरील बाजार समिती समोर सर्व वाहने रोखून धरली. ३ वाजतापर्यंत वाहतूक बंद असल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार डॉ. अशोक उईके आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. यानंतर नाफेडची खरेदी सुरू झाली. या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र कोंबे, उपसभापती महेंद्र घुरडे, संचालक श्याम जगताप, श्रीकांत कापसे, डॉ. रमेश महानूर, अतुल राऊत, डॉ. कृष्णा देमगुंडे, नरेंद्र देशमुख, मुकेश देशमुख, आशीष सोळंके, प्रकाश नागतोडे, प्रवीण खेवले, दिनकर कोंबे, माधव नेरकर, राजू पांडे, दिनेश गुल्हाने, अमोल कापसे, सतीश वानखडे, कृष्णा पांडे, हबीब बेग, शेख अयुब आदी सहभागी झाले होते. आंदोलन सुरू होताच यवतमाळवरून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली होती. यावेळी तहसीलदार दिलीप झाडे, ठाणेदार अनिल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक किशोर सरोदे, पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)