चार केंद्रांवर तूर खरेदी ठप्पच
By admin | Published: March 11, 2017 12:56 AM2017-03-11T00:56:55+5:302017-03-11T00:56:55+5:30
मार्केटिंग फेडरेशनकडे गुरूवारी ३० हजार पोते बारदाना दाखल झाला.
बारदाना पोहोचलाच नाही : यवतमाळचा समावेश, होळीनंतर तोडगा
यवतमाळ : मार्केटिंग फेडरेशनकडे गुरूवारी ३० हजार पोते बारदाना दाखल झाला. १५ पैकी ११ केंद्रांकडे हा बारदाना वळता करण्यात आला. यातून जिल्हा मुख्यालय वगळण्यात आले. यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील चार खरेदी केंद्र बंद राहीले. या ठिकाणी होळीनंतरच तूर खरेदी होण्याची शक्यता आहे.
तूर उत्पादकांची स्थिती बिकट असताना नाफेडचे बारदाना घेऊन निघालेले ट्रक पोहोचले नाही. इतर केंद्रांवरून ३० हजार पोते बारदाना बोलावण्यात आला. मात्र हा बारदाना नाफेडने मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्राकडे प्राधान्याने वळता केला. दोन ते तीन हजार पोते एका केंद्राला मिळाले. यामुळे विदर्भ को-आॅपरेटिव मार्केटिंग फेडरेशनला बारदानाच मिळाला नाही. यातून यवतमाळ, बाभूळगाव, आर्णी आणि राळेगाव केंद्र वगळण्यात आले. या केंद्रांकडे बारदाना नसल्याने होळीपर्यंत सध्या ही केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राला बारदाना आवश्यक असताना चार केंद्रांत पोत्यांअभावी प्रतीक्षाच सहन करावी लागली. या केंद्रावर आतापर्यंत १३ कोटी ३९ लाख ५६ हजार रूपयांची तूर खरेदी झाली आहे. यातील आठ कोटी १९ लाखांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. (शहर वार्ताहर)