‘तंबाखूमुक्त शाळा’ घोषणेचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 09:53 PM2018-01-11T21:53:55+5:302018-01-11T21:54:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.
तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व सलाम बाँम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पांढरकवडा पंचायत समितीमधील १३६ शाळांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी सावित्रीबाई फुले यांचे जयंतीदिनी झालेल्या एका कार्यक्रमात तत्कालीन पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखूचे सेवन न करण्याची शपथही घ्यायला लावली. तसे आदेशही काढण्यात आले. शाळांसमोर बोर्डही लावण्यात आले. परंतु बोर्ड केवळ नावापुरतेच अहे. काही विद्यार्थीही शाळेत सर्रासपणे तंबाखू, गुटखा व खर्ऱ्याचे सेवन करीत असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील शाळांमध्ये पाहावयास मिळते. प्रशासनाचा आदेश मिळाल्यानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणीदेखिल केली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनाही समजावून सांगण्यात आले. पंरतु शाळेतील काही कर्मचारीच विद्यार्थ्यांसमक्ष तोंडात खर्रा कोंबताना दिसतात. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात जनजागृतीची गरज
केवळ तंबाखूमुक्त शाळा झाल्याची घोषणा करून तंबाखूमुक्त शाळा होणार नाही, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. शासनाने अनेकदा आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.