आजपासून राज्यातील ४२ हजार शिक्षकांना घरबसल्या ‘अविरत’ प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 09:36 AM2017-11-22T09:36:31+5:302017-11-22T09:38:54+5:30
विद्या प्राधिकरणातर्फे बुधवार २२ नोव्हेंबरपासून राज्यातील ४२ हजार ११४ शिक्षकांना मोबाईल अॅप आणि पोर्टलवर प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
अविनाश साबापुरे।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : केवळ ‘कागद-पेन्सील’ अशा स्वरुपाच्या वारंवार होणाऱ्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला विटलेल्या शिक्षकांसाठी आता ‘घरबसल्या’ प्रशिक्षणाची सोय झाली आहे. प्रशिक्षणासाठी पुणे किंवा जिल्हास्तरावर जाण्याचीही आता गरज उरलेली नसून यापुढे मोबाईल अॅप आणि पोर्टलवरच शिक्षकांना प्रशिक्षण घेता येणार आहे. तेही शासन म्हणते म्हणून नव्हे तर स्वत:ला गरज वाटते तेव्हाच!
विद्या प्राधिकरणातर्फे बुधवार २२ नोव्हेंबरपासून राज्यातील ४२ हजार ११४ शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. शिक्षकांना वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे स्वरुप आता बदलण्यात आले आहे. केवळ शासनाने लादलेले प्रशिक्षण म्हणून शिक्षकांना पुणे तसेच जिल्हास्तरावर हजर राहावे लागत होते. शिवाय, कागदोपत्री मिळालेले हे प्रशिक्षण नंतर किती शिक्षक प्रत्यक्ष अध्यापनात वापरत यावरही प्रश्नचिन्ह होते. त्यामुळेच आता प्रशिक्षण सतत देत राहण्यासाठी, शिक्षकांना त्यांच्या गावातच प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘अविरत’ प्रशिक्षणाची संकल्पना पुढे आली.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत अविरत प्रशिक्षणासाठी विद्या प्राधिकरणाने आदेश देण्याऐवजी शिक्षकांना आवाहन केले होते. प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असे गृहित धरून पहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षक सहभागी होतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ४२ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. या शिक्षकांना अविरत पोर्टल आणि मोबाईल अॅपद्वारे दहा दिवसांचे आॅनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. या दहा दिवसातील सुरवातीचे दोन दिवस ‘मास्टर ट्रेनर’च्या माध्यमातून तालुकास्तरावर प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. त्यानंतरचे आठ दिवसांचे प्रशिक्षण शिक्षकाला स्वत: आॅनलाईन घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्व आणि प्रशिक्षणानंतर सहभागी शिक्षकांचे आॅनलाईन मूल्यांकन होणार असून, त्याचे प्रमाणपत्रही तातडीने आॅनलाईनच मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक मुख्याध्यापक व एक शिक्षक असे दोन मास्टर ट्रेनर तयार करण्यात आले आहेत. ३६ जिल्ह्यांतील ४०८ तालुक्यांसाठी ८३० मास्टर ट्रेनर निवडून त्यांना पुण्यात प्रशिक्षित करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३२ तज्ज्ञ प्रशिक्षक निवडण्यात आले असून हे प्रशिक्षण निवडश्रेणी, वेतनश्रेणीकरिता उपयोगी ठरेल, अशी माहिती व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक-समुपदेशक संघाचे अध्यक्ष किशोर बनारसे यांनी दिली.
नेटपॅकसाठी पैसे देणार
अविरत प्रशिक्षण शिक्षकांना मोबाईल अॅप आणि अविरत पोर्टलवर घ्यायचे आहे. परंतु, राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्या प्राधिकरणाकडून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नेटपॅकसाठी प्रत्येकी दीडशे रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ४२ हजार शिक्षकांना अविरत पोर्टलचे वर्षभरासाठी मोफत सभासदत्वही दिले जाणार आहे.