आज बहुजन वंचित आघाडीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:36 PM2019-01-15T23:36:30+5:302019-01-15T23:37:50+5:30
सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे. यवतमाळातही बुधवारी दुपारी ३ वाजता वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होत आहे, अशी माहिती आघाडीचे निरीक्षक बालमुकुंद भिरड यांनी पत्रपरिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या सभेला पंढरपुरातून सुरुवात झाली. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि आता यवतमाळमध्ये समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे ही सभा होत आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी, आमदार इम्तियाज जलील, आमदार अॅड.वारीस पठाण, डॉ.डी.एम. भांडे, हिरासिंग राठोड, लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार विजय मोरे संबोधित करणार आहे. जिल्ह्यासह परिसरातूनही मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीतील घटक सभेला उपस्थित राहणार आहे. बारा बलुतेदार आणि समाजातील बहुसंख्य घटक यांना संधी देण्यासाठी हा लढा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्य व देशाच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे, असे बालमुकुंद भिरड यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, शहर अध्यक्ष दिनेश करमनकर, नंदकिशोर निलखन, राजेंद्र तलवारे, अशोक शेंडे, विशाल पोले, प्रमोद पाटील, धनंजय गायकवाड, गुणवंत मानकर, निरंजन खडसे आदी उपस्थित होते.