आज सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा
By admin | Published: March 20, 2016 02:32 AM2016-03-20T02:32:31+5:302016-03-20T02:32:31+5:30
बळीराजा चेतना अभियानांतर्गत श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बळीराजा चेतना अभियान : ११२ जोडपी होणार विवाहबद्ध
यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब नंदुरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयात होणाऱ्या सोहळ्यात सकाळी ११.१५ वाजता ११२ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर सारण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाचा प्रारंभ केला. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा भार शासन उचलणार आहे. त्याकरिता १५ हजार रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वधूला सोने, जोडप्याचे कपडे आणि भांडे दिले जाणार आहेत. सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गत २२ वर्षापासून आयोजन केले जात आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने त्यामध्ये भर घालण्यात आली आहे असे आयोजन समितीचे संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी स्पष्ट केले.
(शहर वार्ताहर)