यवतमाळात आज पहिल्यांदाच देशपातळीवरील नीट परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:16+5:30
केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली देशपातळीवरील नीट परीक्षा यंदा पहिल्यांदाच यवतमाळ शहरातही होत आहे. येथे दोन परीक्षा केंद्र असून तेथे ८४० विद्यार्थी पेपर देणार आहे.
केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजंसीद्वारे ही नॅशनल एन्टरन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट (नीट) घेतली जात आहे. रविवारी सकाळी दुपारी २ ते ५ या वेळात १८० प्रश्नांसह ७२० गुणांची परीक्षा होणार आहे. यात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर ४८० तर दुसऱ्या केंद्रातून ३६० विद्यार्थी बसणार आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर एनटीएच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्याचे केंद्राधिकारी डॉ. विवेक गंधेवार यांनी सांगितले. जगदंबा अभियांत्रिकीतही परीक्षेसाठी सज्जता असल्याचे केंद्राधिकारी डॉ. विजय नेवे यांनी सांगितले.
पेपरच्या तीन तास आधी विद्यार्थ्यांना ‘एन्ट्री’
कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी या परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची एकाच वेळी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी २ वाजता सुरू होणाºया पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासूनच एन्ट्री दिली जाणार आहे. मात्र त्यातही १२०-१२० विद्यार्थ्यांचे चार स्लॉट पाडण्यात आले असून कोणी किती वाजता यावे याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद आहे.
संसर्ग टाळण्यासाठी ‘एक्झिट प्लॅन’
पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची बाहेर निघण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘एक्झिट प्लॅन’ केला आहे. यात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जावे हे निश्चित आहे. त्यांना मार्ग दाखवित गेटपर्यंत नेण्यासाठी कर्मचारी दिमतीला असतील. शिवाय गेटवर ध्वनीक्षेपकाद्वारे याबाबत उद्घोषणा केली जाणार आहे.
सुरक्षित वर्ग रचना
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गरचना करण्यात आली आहे. यावेळी एका वर्गात फक्त बारा विद्यार्थी बसविले जाणार असून एका बाकावर एकच विद्यार्थी असेल. दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे. एका वर्गात दोन इन्व्हीजीलेटर असतील. वर्गात येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क पुरविले जाणार आहे. तसेच नोंदणीची प्रक्रियाही ‘टचलेस’ राहणार आहे.
कोविडची स्थिती बघता पालकांनी सहकार्य करावे. सूचनांचे पालन करून ठरलेल्या वेळीच विद्यार्थ्यांना केंद्रावर आणावे व विद्यार्थ्यांना सोडून लगेच परत जावे. केंद्राबाहेर घुटमळत राहू नये. त्यामुळे गर्दी-गोंधळ होणार नाही.
- डॉ. विवेक गंधेवार, केंद्राधिकारी, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ