यवतमाळमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:00 IST2023-10-30T10:54:52+5:302023-10-30T11:00:41+5:30
१६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी ६०० बसेसची व्यवस्था

यवतमाळमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती
यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे दुपारी १२:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असून, अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड असणार आहेत.
विधानसभा, विधान परिषद सदस्यांसह खासदारांची यावेळी उपस्थिती राहील. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमात ३५ हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विविध योजनांच्या धनादेशांचे वाटप करण्यात येणार असून, यासाठी १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी ६०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी लाभार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.