आज चोख बंदोबस्त, २२० पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:38 PM2019-05-22T21:38:10+5:302019-05-22T21:38:49+5:30
लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसराला अगदी चिलखती संरक्षण दिले आहे. हा परिसर पूर्णत: प्रवेश निशिद्ध ठेवण्यात आला आहे. एकूण २२० पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात केले आहे.
यवतमाळ : लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसराला अगदी चिलखती संरक्षण दिले आहे. हा परिसर पूर्णत: प्रवेश निशिद्ध ठेवण्यात आला आहे. एकूण २२० पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात केले आहे.
दारव्हा मार्गावरील शासकीय गोदाम परिसरात १५० कर्मचारी, १५ पोलीस अधिकारी, दोन चार्ली पथक, एक अॅन्ट गँगचे पथक, दहा वाहतूक शिपाई व तीन अधिकारी तैनात केले आहे. याशिवाय शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकांमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे. शारदा चौक, शनि मंदिर चौक, बसस्थानक चौक, दत्त चौक, आर्णी नाका, स्टॅट बँक चौक, लोहारा चौक येथे एक अधिकारी व पाच कर्मचारी निकाल लागेपर्यंत बंदोबस्ताला ठेवण्यात आले आहे.
मतमोजणी केंद्र परिसरासह शहरातील हालचाली टिपण्यासाठी पोलिसांनी सहा कॅमेरा मन व एक झुमर व्हॅन दिमतीला घेतली आहे. एकंदरच मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, निकालानंतर विजयी पक्षाकडून होणारा जल्लोष आणि विरोधकाची नाराजी यातून संघर्ष होवू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
यवतमाळ शहर पोलीस ठाणे व अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा व मुख्यालयातील राखीव पोलीस शिपाई व अधिकारी या बंदोबस्तासाठी तैनात केले
आहे.
राजकीय नेत्यांच्या घरांनाही संरक्षण
शहरातील सर्वच पक्षातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त ठेवण्यता येणार आहे. तसेच लोकसभेतील उमेदवारांच्या घरांनाही संरक्षण दिले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.