पोलीस कुटुंबीयांचा आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 01:11 AM2016-09-19T01:11:06+5:302016-09-19T01:11:06+5:30
पोलिसांचे कुटुंबीय विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत.
हल्ल्याचा निषेध : सोमवारी हेलीपॅड मैदानातून होणार सुरुवात
यवतमाळ : पोलिसांचे कुटुंबीय विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. त्याच्या निषेधार्थ पोलीस कुटुंबीयांतर्फे सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोमवार, १९ सप्टेंबर रोजी येथील पोलीस दक्षता भवन येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. पोलीस कुटुंब संघर्ष समितीच्यावतीने निघणाऱ्या मोर्चात विविध मागण्या रेटण्यात येणार आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, पोलीस संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, जिल्ह्यातील अनुकंपा भरती तातडीने करावी, बदली प्रक्रियेमधील संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे मत जाणून घेऊनच बदली करावी, भविष्य निर्वाह निधी १५ दिवसांच्या आत मंजूर करावे, पोलिसांच्या ड्यूटीचे तास ठरवून द्यावे, पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस बॉईजला पाच टक्के पूर्ण आरक्षण द्यावे, पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास प्रशासनाने वैद्यकीय व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस प्रशासनावरच आज संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात पोलिसांवर होणारे हल्ले निंदनीय आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना समाजाने आधार देण्याची गरज आहे. पोलिसांच्या सामाजिक समस्या, कौटुंबीक समस्यांची शासनाने दखल घ्यावी, यासाठी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व मानवतावादी संघटनांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस कुटुंब संघर्ष समितीने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)