जात निर्मूलनाची आजही गरज

By admin | Published: April 11, 2017 12:09 AM2017-04-11T00:09:43+5:302017-04-11T00:09:43+5:30

भारातील महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, येथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि ब्राह्मण जातीतूनसुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाची ...

Today's Need for Caste Eradication | जात निर्मूलनाची आजही गरज

जात निर्मूलनाची आजही गरज

Next

सुखदेव थोरात : समता पर्वाचे थाटात उद्घाटन, मागास समाजापुढील आव्हानांवर व्याख्यान
यवतमाळ : भारातील महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, येथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि ब्राह्मण जातीतूनसुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाची आणि जातीनिर्मूलनाची मोहीम चालविणारे महापुरूष निर्माण झाले आहेत. १९५० नंतर मात्र ही परंपरा खंडीत झालेली दिसते. भारतीय संविधानानुसार अस्पृश्यता आणि जात निर्मूलन होईल या भ्रमात आम्ही राहिलो. परंतु, आजवरचा अनुभव लक्षात घेता जातीच्या भिंती अधिक मजबूत होत असल्याचे दिसते. म्हणूनच आजही जाती निर्मूलन आवश्यक आहे, असे मत पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी समता पर्वात उद्घाटक या नात्याने व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदीप कांबळे होते. ‘बदलत्या परिवेषात मागास समाजापुढील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, आजही महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भात दलित, आदिवासी आणि ओबीसींपुढे अनेक समस्या आहेत. एकीकडे राज्य प्रगतीपथावर असताना गरिबी कमी झाली नाही. आकडेवारीचे दाखले देऊन त्यांनी सांगितले की विदर्भात १७ टक्के लोक गरीब असून, त्यात ५४ टक्के आदिवासी, २१ टक्के दलित, १४ टक्के ओबीसी, ९ टक्के उच्चवर्णीय आणि १९ टक्के मुस्लिमांचा समावेश आहे. गरिबीबरोबरच शिक्षणातही खूप तफावत आहे. दरडोई उत्पन्नाची आकडेवारी पाहिली तर दलितांचे उत्पन्न कमी आहे. दोन वेळचे जेवण न मिळणारा फार मोठा वर्ग या देशात आहे, ही आपल्यासाठी भूषणावह बाब नाही.
नागरी अधिकारांच्या बाबतीतसुद्धा असे दिसते की, सार्वजनिक सेवा आजही सर्वांना उपलब्ध नाहीत. बहिष्काराच्या तंत्राने आजही दलितांची कोंडी केली जाते. अन्यायाची ही प्रक्रिया सातत्याने चालत आहे. दलितांना उत्पन्नाची साधने कमी आहेत. हातमजुरी करणारे दलित ५० टक्के, एसटी ४२ टक्के, ओबीसी २९ टक्के तर उच्चवर्णीय २५ टक्के आहेत. आरक्षणामुळे दलितांची प्रगती झाली आहे. खासगीकरणाने त्याला खिळ बसणार आहे. म्हणूनच शिक्षण आणि खासगी क्षेत्रात आरक्षण असणे महत्वाचे आहे.
यावर उपाय सांगताना ते म्हणाले, दलितांनी जमिनीचे मालक व्हावे. याशिवाय उद्योगधंदे निर्माण करून भांडवलासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिेजे. लहान-सहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अनेक मोठ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. सर्वांनी शिक्षण घ्यावे, संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
अध्यक्ष डॉ. कांबळे यांनी १२ वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम अधिक नेटाने आणि जोमाने सुरू ठेवण्यासाठी तरुणपिढीकडे हा वारसा सोपविण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंकुश वाकडे यांनी केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Today's Need for Caste Eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.