रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, चिमुकल्याचा जागीच मृत्यू
By रवींद्र चांदेकर | Published: August 23, 2023 05:56 PM2023-08-23T17:56:06+5:302023-08-23T17:56:46+5:30
निंबी गावावर शोककळा
पुसद (यवतमाळ) : तालक्यातील निंबी येथे चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडत असताना एक दहावर्षीय चिमुकला ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास घडली.
ओकार किसन लांडगे (१०), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वसंतनगर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या निंबी येथे वाशिम मार्गे पुसदकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाने (क्र. एमएच १९-बीजे ७८४७) ओंकार लांडगे याला रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, की ओंकारच्या डोक्याला जबर मार लागला. पायावरून वाहन गेल्याने उजवा पाय गुडघ्यातून खाली तुटला. गावकऱ्यांनी धाव घेऊन ओंकारला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ओंकारचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. ओंकार हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच वारले. आई कामाकरिता पुण्याला आहे. ओंकार लहानपणापासून त्याच्या आजीजवळ निंबी येथे राहत होता. पोलिसांनी पंचनामा केला असून, घटनेतील वाहन वसंतनगर पोलिस स्टेशन येथे जमा केले. या घटनेने निंबी गावात शोककळा पसरली आहे.