वणीतील टोलनाक्याकडून नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:11 AM2019-02-10T00:11:35+5:302019-02-10T00:11:59+5:30
येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे.
३० वर्षाच्या मुदतीसाठी हा टोल नाका उभारण्यात आला आहे. आयव्हीआरसीएल या कंपनीच्या अखत्यारीतील या टोलनाक्यावर मात्र सावळागोंधळ सुरू आहे. करंजी-वणी-घुग्गूस-ताडाळी या चौपदरी राज्य महामार्गाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीने केले. त्यानंतर करंजी, वणी व घुग्गूस अशा तीन ठिकाणी टोलनाके तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र वणी येथील टोलनाका सुरू होताच तो वादग्रस्त ठरला. रस्त्याच्या देखभाल, दुरूस्ती व इतर रस्ता विकासाच्या कामाची जबाबदारी या कंपनीवर आहे. पुढील ३० वर्ष टोलवसुली करून या कंपनीला या मार्गाची देखभाल करावयाची आहे. परंतु करार करताना ज्या नियम व अटी घालून देण्यात आल्या. त्या सर्व नियम व अटी या कंपनीकडून पायदळी तुडविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून या मार्गावर ठिकठिकाणी सुसज्ज प्रसाधनगृहे बांधणे बंधनकारक होते. परंतु या कंपनीने थातुरमातूर प्रसाधनगृहे उभारली खरी. परंतु यातील अनेक प्रसाधनगृहाला टाळे लावून असल्याचे दिसून येत आहे. तर जे प्रसाधनगृह सुरू आहे, त्याच्या स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य महामार्गाचे काम करताना अनेक ठिकाणची पुरातन वृक्षे तोडण्यात आली. त्याबदल्यात दुप्पट वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी या कंपनीवर टाकण्यात आली होती. परंतु या कंपनीने त्या तुलनेत फारशी वृक्ष लागवड केल्याचे दिसून येत नाही. रस्ता स्वच्छतेच्या बाबतीतही टाळाटाळ केली जात आहे. करारात ही अट टाकण्यात आली आहे. परंतु रस्त्याची स्वच्छता कुठेही दिसत नाही. वरोरा बायपासवर कायम धुळीचे साम्राज्य असते. गंभीर बाब ही की, टोलनाक्याच्या अवतीभवतीच कोळशाच्या धुळीचे ढिगारे उभे आहेत. वाहनांच्या अवागमनाने ही धूळ वातावरणात उडत असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर नियंत्रणासाठी या कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. असा सारा सावळागोंधळ सुरू असताना बांधकाम विभाग गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-तर वाहनांची अवैध टोल वसुली बंद पाडू-राजू उंबरकर
मुळात वणी येथे उभारण्यात आलेला टोलनाकाच गैरकायदेशीर असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला आहे. आयव्हीआरसीएल या कंपनीने शासनाशी टोल नाक्यासंदर्भात केलेले करार मोडण्याचा एककलमी कार्यक्रम या कंपनीकडून सुरू आहे. त्यातून वाहनधारकांची सर्रास लुट केली जात असल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. या राज्य महामार्गाच्या दुतर्फा केलेल्या नाल्या संपूर्णत: बुजल्या आहे. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे पिकांची अतोनात हानी झाली. त्याचा मोबदलाही या कंपनीने अदा केला नाही. या कंपनीने अधिकाºयांना हाताशी धरून मनमानी सुरू केली असून येत्या आठ दिवसात धोरणात सुधारणा न केल्यास वाहनांची अवैध टोलवसुली बंद पाडू, असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.