टोल टॅक्स कर्मचाऱ्याची एसटी चालक ास मारहाण
By Admin | Published: March 11, 2017 01:03 AM2017-03-11T01:03:49+5:302017-03-11T01:03:49+5:30
एस.टी. चालकाने दिलेली १० रुपयांची नाणी स्विकारण्यावरुन वाद होऊन एस.टी. चालकाला टोल बुथ कर्मचाऱ्याने अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना
पांढरकवडा : एस.टी. चालकाने दिलेली १० रुपयांची नाणी स्विकारण्यावरुन वाद होऊन एस.टी. चालकाला टोल बुथ कर्मचाऱ्याने अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास येथील राष्ट्रीय महामार्गावरील केळापूरनजिक टोल बुथवर घडली. टोल बुथवरील कर्मचाऱ्याची दादागिरी पुन्हा वाढल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.
पांढरकवडा आगाराची पांढरकवडा - घाटंजी मार्गे पारवा ही एम.एच.४० - ८९५५ क्रमांकाची बस दुपारी २ वाजता पारव्याला जात होती. येथून जवळच असलेल्या महामार्गावरील टोल बुथवर टोल टॅक्स देण्यासाठी बस थांबली. एस.टी. चालकसुधाकर रामपुरे यांनी ५० रुपयांची नोट व दहा रुपयांची ११ नाणी असे १६५ रुपये टोल टॅक्स बुथवरील कर्मचाऱ्याला दिले. परंतु या कर्मचाऱ्याने १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. १० रुपयांची नाणी बंद झाली नसून ती चलनात आहे, असे सांगण्याचा प्रयत्न चालक सुधाकर रामपुरे यांनी केला. परंतु त्यांचे काहीही न ऐकता टोल टॅक्स कर्मचाऱ्याने दहा रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देऊन अश्लिल शिविगाळ करीत रामपुरेंना मारहाण केली. घटनेनंतररामपूरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द भा.द.वि.कलम १८६,१५३, ३५३, २९४ अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहेस्तोवर आरोपीचे नाव कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)