‘शांती वाघिणी’च्या डरकाळीने पेटली होती क्रांतीची मशाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:00 AM2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:26+5:30
औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ध्यास लागला बाबासाहेब आंबेडकर या नावाचा.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आजन्म शिकत राहिलो तरी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यातच पोहोचता येईल, एवढा हा ज्ञानसागर अथांग आहे... अशा शब्दात ज्ञानाची, शिकण्याची महती गाणाऱ्या बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, म्हणून महाराष्ट्रात विचारांचा आगडोंब उसळला होता. तेव्हा यवतमाळ मात्र गाढ झोपेत होते. अखेर येथील निद्रिस्त जनतेला जागे केले ‘शांती वाघिणी’च्या डरकाळीने...
काय होती ती डरकाळी? कोण होती ती वाघीण? अन् बाबासाहेबांच्या नावासाठी तिने यवतमाळात कशी घडविली क्रांती? चला, जाणून घेऊ या तो इतिहास...
औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ध्यास लागला बाबासाहेब आंबेडकर या नावाचा. तेव्हा नागपूरमध्ये झालेल्या परिषदेत बाबासाहेब म्हणाले होते, महिलांनी सामाजिक चळवळींमध्ये पुढे आलेच पाहिजे... हा मंत्र कर्णोपकर्णी शांताबाईपर्यंत पोहोचला अन् त्यांचे अंतर्मन ढवळून निघाले. जोगेंद्र कवाडे यांच्या संपर्कातून ही महिला सक्रीय झालीच होती. तेवढ्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा आवाज घुमू लागला अन् महाराष्ट्र पेटू लागला. त्याच्या ज्वाळा शांताबाईपर्यंत धडकल्या अन् त्यांनी ठरविले, यवतमाळातूनही या लढाईसाठी समर्थनाची रसद पोहोचलीच पाहिजे.
शांताबार्इंनी पाटीपुºयातील खंबिर महिलांची फळी तयार केली. अन् विद्यापीठ नामांतरासाठीचा महाराष्ट्रातील पहिला मशाल मोर्चा यवतमाळात काढला. शांताबाईच्या नेतृत्वात पार्वताबाई गायकवाड, सुगंधाबाई कचराबुढी, कमला गायकवाड, तुळसाबाई ढवळे हाती मशाल घेऊन मार्गक्रमण करू लागल्या. पाटीपुºयातून सुरू झालेला हा मशाल मोर्चा शारदा चौक मार्गे तहसीलकडे निघाला. मात्र विरोधक एकवटले. मोर्चा अडविण्यात आला. प्रचंड दगडफेक करण्यात आली. शेवटी या प्रकरणात महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. शेवटी अॅड. काकासाहेब चमेडिया यांनी जमानत घेऊन महिलांची सुटका केली.
सुटका झाली पण संघर्षाचे बिज शांताबाईच्या मनात कायमचे रुजले. ‘शांती वाघीण’ म्हणून त्यांचे नाव सर्वांच्या तोंडवळणी पडले. फळविक्री करतानाही त्यांच्या गाण्यांमधून क्रांतीच्या ज्वाळाच धुमसत राहायच्या...
वाघाच्या पिंजऱ्यात सापाला कोंडलं
वाघाची भाषा त्याला येईल काय?
हे शांताबाईचं गाणं आजही पाटीपुरावासीयांच्या स्मरणात आहे. अन्यायग्रस्तांसाठी भांडणे हा शांताबाईचा स्थायीभाव होता. बिडी कामगारांच्या प्रश्नांसाठी झगडणारी महाराष्ट्रातील पहिली महिला म्हणून शांताबाईचे नाव अविस्मरणीय आहे. तेंदूपत्ता कामगारांसाठी चक्क नाशिक, मुंबईपर्यंत जाऊन त्यांनी मोर्चे काढले. अशाच एका प्रसंगात यवतमाळातील पिंपळगावातील उपेक्षितांची घरे जाळण्यात आली होती. तेव्हा त्या नागरिकांच्या राहण्याची, जेवण्याची सोय करण्यासाठी शांताबाई पदर खोचून सर्वात पुढे होत्या. बाळा भोसले, अवधूत वनकर, रमाकांत वाघमारे, निळाबाई जोगळेकर, उमेश मेश्राम, शशिकांत वासनिक, कचराबाई वानखेडे आदींची साथ मिळवत त्या लढत राहिल्या. ज्याकाळी महिला पिचलेल्या होत्या तेव्हा नेतृत्व देणारी महिला म्हणून शांताबाईची ओळख संस्मरणीय आहे.
चार मुली घडविल्या... वाघिणीसारख्याच!
शांताबाईचे माहेर तळेगाव दशासर. शिक्षण कसेबसे चौथीपर्यंत झालेले. पण अपार कष्ट उपसत त्यांनी आपल्या चारही मुलींना वाघिणीसारखे सक्षम बनविले. प्रमोदिनी यवतमाळातल्या सामाजिक चळवळींमध्ये अग्रस्थानी आहेत. दुसरी मुलगी पल्लवी यवतमाळात नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. तर तिसरी मुलगी ज्योत्स्ना सहारे कंट्रोलधारक आहे. चौथी मुलगी छायाताई कांबळे प्राचार्य आहे. समाजासाठी झगडत-झगडतच सात वर्षांपूर्वी शांताबाई रामटेके यांनी देह त्यागला. पण आईच्या आठवणी सांगताना त्यांच्या मुली थकत नाहीत. प्रमोदिनी रामटेके म्हणाल्या, आई नेहमी म्हणायची की बाबासाहेबच माझ्या पाठीशी आहे. तिचाच वारसा चालविण्याचा प्रयत्न आम्ही चारही बहिणी करीत आहोत.
दगडफेकीत जेव्हा ठाणेदाराचेच प्राण वाचविले..!
१९८२ सालातली ही गोष्ट. यवतमाळात तेव्हा दोन समाजात तेढ निर्माण करणाºया काही प्रवृत्ती प्रबळ झाल्या होत्या. त्यातूनच लगतच्या दोन परिसरातील नागरिकांमध्ये एका विटंबणा प्रकरणातून तुफान झगडा झाला. दोन्ही बाजूंनी गोटमार झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पोहोचले. पण त्यात खुद्द तत्कालीन ठाणेदार रामदास वºहाडे यांच्याच डोक्यात दगड लागला. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दगडांचा मारा थांबायचे नाव घेत नव्हता. ते पाहून शांताबाई रामटेके पुढे धावल्या अन् थेट ठाणेदारांना उराशी कवटाळले. आपल्या लुगड्याचा पदर फाडून त्यांच्या जखमेला बांधला. कसाबसा ठाणेदारांचा जीव वाचला. पण या प्रकरणात ज्या शे-दीडशे लोकांना आरोपी बनविले गेले, त्यात पहिले नाव होते शांताबाई रामटेके. अनेक वर्षे केसेस चालल्या. नंतर त्या मागे घेण्यात आल्या. दरम्यानच्या काळात यवतमाळात खैरलांजी आंदोलन पेटले, तेव्हाही शांताबाई सर्वात पुढे होत्या. मोर्चा निघाला तेव्हा १४-१५ वर्षाच्या पोरीला पोलीस मारत असल्याचे पाहून शांताबाई आडव्या गेल्या. पण पोलिसांनी ‘बाजूला हो बुढे’ म्हणत त्यांनाच मारहाण केली. हाताला गंभीर दुखापत झाली. पण शांताबाईने पोलिसांना थांबवून त्या पोरीला मात्र वाचविलेच. पाटीपुरातील कोणत्याही उपेक्षितासाठी भांडणारी, अन्यायाला वाचा फोडणारी ‘शांती वाघीण’ म्हणून शांताबाई रामटेकेंचे नाव मात्र आजही कायम आहे.