पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

By Admin | Published: March 11, 2017 01:05 AM2017-03-11T01:05:56+5:302017-03-11T01:05:56+5:30

मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

Tornado Overcrowding Troublesome | पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

googlenewsNext

नगर परिषदेचे दुर्लक्ष : समस्यांमध्ये पडली भर, नागरिक हैराण
पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींची दुर्दशा संपेल, या वसाहतींना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतीला पाहिजे त्या प्रमाणात सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्यामनगरी-२, पोसवाल ले-आऊट, आशियाना ले-आऊट, राधेयनगरी, जंगूबाई टेकडी परिसर, रामकृष्णनगर, चिंतामणी ले-आऊट आदि परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये समाविष्ठ करण्यात आला. हा भाग नगरपरिषदेच्या क्षेत्रात आल्यामुळे मतदारांची संख्याही वाढली. त्यामुळे नगरपरिषदेचे दोन नविन सदस्य निवडून देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये निवडणूकसुद्धा झाली. या निवडणुकीत नगरपरिषदेतील सत्तारुढ कॉग्रेसचे मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे दोन सदस्य निवडून आलेत. या दोन जागांसाठी निवडणूक होऊन दोन वर्षे होत आहेत. तरी नगर परिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झाला नाही. अनेक वसाहतीत अद्यापही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.रस्त्याची कामे झाली नाहीत. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या नाल्यांची नियमित साफ सफाई केल्या जात नाही.
नगर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करुन पांढरकवडा नगर परिषदेची हद्दवाढ करुन घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली. नगर विकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने पांढरकवडा नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ सदस्यांची असलेली पांढरकवडा नगरपरिषद १९ सदस्यांची झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. नगराध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षांसाठी महिला सदस्यासाठी राखीव असल्यामुळे ३० जून २०१५ रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात.
या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले.नगर परिषदेला पुर्ण वेळ अभियंताच नव्हता. कोणाचा पायपोस कोणाला नाही,अशी या नगर परिषदेची स्थिती झाली. विकासाची कामे खोळंबली. या वसाहतींचा विकास न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी)

घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगर परिषदेने लाखो रुपयांचा कर देखील वसूल केला आहे.परंतु या ठिकाणी साधी पाणी पुरवठ्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नाही.पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनच टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु ती पाईप लाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे.या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
 

Web Title: Tornado Overcrowding Troublesome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.