पर्यटकांना ‘आर्ची’ खुणावतेय; तलाववालीला पाहण्यासाठीही गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:15+5:30
तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, तशीच टिपेश्वर अभयारण्यात असलेली आर्ची नामक वाघिण, तलाववाली वाघिण यांच्यासह पिलखानवाली, जंजीर, ट्रिकल नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत आहे.
योगेश पडोळे
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील टिपेश्वर अभयारण्यातील जंगल सफारी दरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटक ‘आर्ची व ‘तलाववाली’ अशी ओळख असलेल्या वाघिणीची एक झलक पाहण्यासाठी अभयारण्यात गर्दी करीत आहेत. जंगलातील काही पाणवठ्यावर या ऐटबाज आर्ची वाघिणीसोबत तिचे तीन बछडे व तलाववाली वाघिणीसोबत तिच्या चार बछड्यांचे दर्शन पर्यटकांना हमखास होत आहे. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसह बच्चेकंपनीलाही व्याघ्रदर्शनाचा आनंद मिळत आहे.
तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, तशीच टिपेश्वर अभयारण्यात असलेली आर्ची नामक वाघिण, तलाववाली वाघिण यांच्यासह पिलखानवाली, जंजीर, ट्रिकल नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत आहे. देशभरात ओळख असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात तलाववाली आणि आर्ची या दोन वाघिण आहेत. वन विभागाने कागदावर तलाववाली वाघिण टी-२ तर आर्ची या वाघिणीची टी-७ अशी नोंद घेतली आहे. या दोन्ही वाघिणींचे सध्या पर्यटकांना सहज दर्शन होत असून दिवसेंदिवस टिपेश्वर अभयारण्यात भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर लगतच्या आंध्रप्रदेशातूनही पर्यटक येथे येत आहेत.
झुडुपातून बघते तेव्हा पसरते शांतता
- सध्या टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना आर्ची, तलाववाली नामक वाघिणीचे दर्शन होत आहे. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची जीप पुढे गेल्यावर हळूच आर्ची, तलाववाली या दोन्ही वाघिण झुडुपातून बाहेर निघत पर्यटकांच्या जीपकडे बघते. याप्रसंगी स्मशानशांतता पसरत असून तिच्या या अंदाजामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह वन्यजीवप्रेमी सध्या खूश आहेत.