लोणीवासीयांचा पाण्यासाठी टाहो
By Admin | Published: March 11, 2016 02:53 AM2016-03-11T02:53:53+5:302016-03-11T02:53:53+5:30
तालुक्यातील लोणी येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला आहे.
तीन दिवसांपासून पुरवठा नाही : ग्रामपंचायतीवर महिला धडकल्या
आर्णी : तालुक्यातील लोणी येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला आहे. याचा संताप व्यक्त करीत महिलांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.
कधी काळी लोणी हे गाव संपूर्ण आर्णी तालुक्याचे सत्ता केंद्र होते. दिग्गज नेत्यांच्या नावामुळे लोणी चर्चेत राहायचे. आता मात्र पाणीटंचाईमुळे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीपुरवठा बंद आहे. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारपंप जळल्यामुळे व गावातील एका बोअरवेलला पाईप कमी पडत असल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. किरकोळ बाबीसाठी गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याचा संताप व्यक्त करीत गुरुवारी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंचांना निवेदन दिले. सरपंच जनार्धन होलगरे, सचिव अनिल जगताप यांच्याकडे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सरपंच आणि सचिवांनी दिले. यावेळी फुलाबाई रामटेके, मंगला मेश्राम, कमला साखरकर, लीना रामटेके, सीमा खोब्रागडे, सविता खंदारे, संगीता इंगोले, सुनीता दळवे, आशा सोनटक्के, योगीता लाड, संगीता शिंदे उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)