पुसद शहरात वाहतुकीचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:16 PM2019-04-30T22:16:55+5:302019-04-30T22:22:16+5:30
नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. मात्र हेच पोलीस शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून जाणाऱ्या अवडज वाहनांवर का दुर्लक्ष करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक शाखा आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे.
पुसद शहरातील बाजारपेठेत महात्मा फुले चौक ते शिवाजी चौक, सुभाष चौक ते शिवाजी चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, नाईक चौक ते महात्मा फुले चौक, कार्ला मार्ग, वाशिम मार्ग या परिसरातील रस्त्यांसह शहरातील अनेक ठिकाणी हातगाडीवाल्यांनी आपली दुकाने भर रस्त्यातच लावली आहे. नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणाचा विषय अनेकदा हाताळला पण त्याला सकारात्मक प्रतिसाद अल्पसाच मिळाला.
दुसरीकडे पोलीस प्रशासन दुचाकी स्वारांवर कठोर कारवाई नेहमीच करते. दुचाकीस्वार हे त्यांचे ‘टार्गेट’ असते. चारचाकीस्वार नियमाचे उल्लंघन करून जात असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही. सिग्नल तोडला तरी चारचाकी स्वारावर कारवाई होत नाही. परंतु दुचाकीस्वाराने चूक केल्यास तो फार मोठा अपराध वाहतूक शाखेचे पोलीस मानतात आणि तातडीने पकडून कारवाई करतात. पुसद शहरात मुख्य बाजारपेठेत कोणत्याही रस्त्यावर नजर टाकली तर हातगाडीवाले भर रस्त्यात उभे दिसतात. नगरपालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे दुकानदारी बेधडक सुरु आहे. अनेक भागातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूकीची कोंडी हा कायमचा प्रश्न बनला आहे. परंतु अरुंद रस्त्यांवर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे.
प्रशासनावर संशय
गर्दीच्या वेळी शिवाजी चौक, तीन पुतळे चौक, बसस्थानका समोरील मार्ग, गांधी चौक, कापड लाईन, नाईक चौक या भागातमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा श्वास गुदमरतो. काही चौकात वाहतूक कर्मचारी दिसत असले तरी ते निव्वळ दुचाकी स्वारांवर ‘डोळा’ ठेवतात. पण अडथळा आणणारे चारचाकी चालक, हातगाडीवाले, छोटे दुकानदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. या संपूर्ण प्रकारामुळे वाहतूक शाखा आणि नगरपालिका प्रशासनाबाबत संशय निर्माण झाला आहे.