वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादनाचा ‘ट्रॅक’ खुुला
By admin | Published: January 14, 2015 11:14 PM2015-01-14T23:14:52+5:302015-01-14T23:14:52+5:30
बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील भूसंपादनाचा मार्ग बऱ्याच अंशी मोकळा झाला आहे. भूसंपादनासह विविध कामांसाठी १७ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे
१७ कोटी मिळाले : कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अंतिम टप्प्यात
यवतमाळ : बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील भूसंपादनाचा मार्ग बऱ्याच अंशी मोकळा झाला आहे. भूसंपादनासह विविध कामांसाठी १७ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वळता करण्यात आला आहे. भूसंपादनाच्या कामासाठी संबंधित गावातील लोकांशी संपर्क केला जात आहे. शिवाय रुळ, पूल आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आदी कामांना गती देण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे. वर्धा ते यवतमाळ या ७८ किलोमीटर अंतरात दोन्ही जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जमीन संपादित केली जात आहे. आतापर्यंत ३१ किलोमीटरपर्यंत जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील जमिनीचाही समावेश आहे. संपादित झालेल्या जागेवर तीन प्रमुख ठिकाणी रेल्वे पूल तयार केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील भिडी येथे पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
रेल्वे मार्ग तयार करताना काही ठिकाणी पुलाची निर्मिती आवश्यक आहे. यात लहान आणि मोठ्या पुलांचा समावेश असणार आहे. निर्धारित ठिकाणी पूल उभारणे सोयीचे व्हावे यासाठी सिमेंटचे साचे तयार केले जात आहे. सदर काम येथील शकुुुंतला रेल्वे स्थानकाच्या खुल्या जागेत करण्यात येत आहे. ३०० साचे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. यासोबतच रेल्वे ट्रॅक तयार करताना लागणाऱ्या सिमेंट फळ्या तयार करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांना काम करताना कुठल्याही अडचणी येऊ नये, यासाठी त्यांच्याकरिता निवासस्थाने बांधण्यात आली आहे. तीन इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. १६ कर्मचारी कुटुंब या ठिकाणी राहू शकतील. रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य येथे उपलब्ध झाले आहेत. विविध कामांसाठी ठिकठिकाणचे मजूर आणि तज्ज्ञ दाखल झाले आहेत. (शहर वार्ताहर)