२० हजार क्विंटल तूरीवर व्यापाऱ्यांचा डोळा

By admin | Published: April 23, 2017 02:35 AM2017-04-23T02:35:12+5:302017-04-23T02:35:12+5:30

नाफेडमार्फत अखेरच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू, अशी गगणभेदी घोषणा सरकारने केली होती.

Traders eye on 20 thousand quintals of pearl | २० हजार क्विंटल तूरीवर व्यापाऱ्यांचा डोळा

२० हजार क्विंटल तूरीवर व्यापाऱ्यांचा डोळा

Next

वणी उपविभाग : नाफेडची दारे बंद, ८५० शेतकरी तूर विक्रीपासून वंचित
वणी : नाफेडमार्फत अखेरच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू, अशी गगणभेदी घोषणा सरकारने केली होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून नाफेडने तूर खरेदीसाठी आपली दारे बंद केली आहे. त्यामुळे वणी उपविभागातील ८५० शेतकरी तूर विक्रीपासून वंचित झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली २० हजार क्विंटल तूर आता व्यापारी म्हणेल त्या भावात शेतकऱ्यांना विकावी लागणार आहे.
नाफेडद्वारे तूर खरेदीचा शनिवारी अखेरचा दिवस होता. पाच हजार ५० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी करण्यात आली. १ जानेवारीला वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले होते. ३० जानेवारीपासून प्रत्यक्षात तूर खरेदीला सुरूवात झाली. शुक्रवार २१ एप्रिलपर्यंत ८०३ शेतकऱ्यांनी १० हजार ९१७ क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली. त्यापोटी नाफेडने संबंधित शेतकऱ्यांना पाच कोटी ५१ लाख ३३ हजार ८३० रुपये अदा केले, अशी माहिती वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अ.का.झाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
शनिवारी नाफेडद्वारे तूर खरेदीचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपली वाहने तूर विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २१५ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली.
मागील वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्याने यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने वणी उपविभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली. उत्पादनही चांगले झाले. नाफेडने पाच हजार ५० रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू केली. मात्र तूर खरेदी दरम्यान, नाफेडने बारदाणा नसल्याचे कारण पुढे करून अनेकदा तूर खरेदीला ‘ब्रेक’ दिला. त्या काळात अनेक शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना तूर अल्प किंमतीत तूर विकावी लागली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
आता नाफेडने तूर खरेदीसाठी आपले दार बंद केल्याने तूर खरेदीसाठी टोकन देण्यात आलेले वणी उपविभागातील ८५० शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहणार आहे. सरकारने तूर खरेदीला मुदतवाढ न दिल्यास शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेली सुमारे २० हजार क्विंटल तूर कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

जवळपास २० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शासनाने तूर विक्रीसाठी मुदतवाढ द्यावी. यासंदर्भात रविवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती व संचालकांची बैठक आहे. या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजुने असून मुदतवाढ न दिल्यास प्रसंगी आम्ही आंदोलनात उतरू.
संतोष कुचनकार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी
 

Web Title: Traders eye on 20 thousand quintals of pearl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.