यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्यांचं 60 पोती धान्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 02:10 PM2017-09-28T14:10:39+5:302017-09-28T14:11:34+5:30
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेलं व्यापाऱ्याचं ६० पोती धान्य गुरुवारी बाजार समितीने जप्त केले.
यवतमाळ- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेलं व्यापाऱ्याचं ६० पोती धान्य गुरुवारी बाजार समितीने जप्त केले. हे धान्य उचलण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर १५ व्यापाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही धान्य न हलविल्याने अखेर ते जप्त करण्यात आले. त्यात सोयाबीन, तूर, चना या धान्याचा समावेश आहे.
धान्य जप्त करून शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजार समितीने यार्ड खाली करून घेतले. दरम्यान बाजार समितीच्या या कारवाईनंतर व्यापाऱ्यांनी शेतमालाचा लिलाव बंद केला होता. सकाळपासून १.३० वाजेपर्यंत हा लिलाव बंद होता. त्यामुळे दसऱ्याच्या तोंडावर उडीद, चना, सोयाबीन, तुरी विक्रीसाठी आलेले शेतकरी ताटकळत बसले होते. अखेर बाजार समिती सभापती, उपसभापतींनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावून मध्यस्थी केली, त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केला.
सेस ७५ पैशावरुन एक रुपया
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालावरील सेस ७५ पैशावरून १ रुपया करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. सेस ७५ पैसे केल्यास शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली होती. परंतु प्रत्यक्षात अपेक्षित सोई-सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे सेस २५ पैशांनी वाढवून प्रति क्विंटल एक रुपया करण्यात आला.