आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा

By admin | Published: March 20, 2016 02:25 AM2016-03-20T02:25:07+5:302016-03-20T02:25:07+5:30

अनाठायी खर्चाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेची बचत म्हणून आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Tradition of wedding rally in Arni taluka | आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा

आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा

Next

खर्चाला आळा : तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मेळाव्याचे आयोजन
आर्णी : अनाठायी खर्चाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेची बचत म्हणून आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक मोठे विवाह मेळावे याठिकाणी झालेले आहेत. या मेळाव्यांना राज्यातील मोठ्या पदावरील लोकांनी भेटीसुद्धा दिल्या आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कोळवन येथे एका मेळाव्यासाठी आले होते तर आता २० मार्च रोजी तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विवाह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात ७५ विवाह पार पडणार असल्याची माहिती आयोजक माजी आमदार बाळासाहेब मुंनगीनवार यांनी दिली आहे.
यापूर्वी मुंनगीनवार यांनी कोळवन येथे सहा विवाह मेळावे घेतलेले आहेत. १९९८ साली कोळवन येथे मोठा विवाह मेळावा झाला. त्यापूर्वी बौद्ध समाजाचा विवाह मेळावा म.द. भारती विद्यालयामध्ये झाला होता. त्यामध्ये १८ जोडप्यांचे विवाह झाले होते. त्याच दरम्यान दिग्रस तालुक्यात वडगाव येथे बंजारा समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला रामराव महाराज, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, अशोक शिंदे उपस्थित होते. ही सर्व मंडळी आर्णी येथेसुद्घा आली होती. बोरगाव येथील फुलसिंग नाईक यांनी १९७३ व त्यापूर्वी असे दोन विवाह मेळावे घेतले. एका मेळाव्यात तर त्यांनी स्वत:च्या मुलीचेही लग्न लावले. तत्कालिन महसूल मंत्री व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. मागील १० वर्षांपासून आर्णीचे शेख आरीफ शेख अहेमद हे मुस्लिम विकास मंचकडून मुस्लिम समाजातील विवाह मेळावे घेत आहेत. १४७ जोडप्यांचे त्यांनी आजवर विवाह लावलेले आहेत. उमरी कापेश्वर येथील पांडुरंग मोरे महाविद्यालयात आदिवासी विवाह मेळावा झाला होता. लोणबेहळ येथे स्वत:च्या शेतात सतत चार वर्ष सुनील भारती व मित्र मंडळींनी आदिवासी विवाह मेळावे घेतले. त्यातून ५० लग्न लावलीत. केळझरा कोमटी येथील आकाश राठोड हा येत्या २३ एप्रिलला मेळावा घेत आहे. यामध्ये आतापर्यंत १६ विवाहांची नोंदणी झाली आहे. माळेगाव येथील रामराव डाखोरे यांनी स्वत: खर्च करून सर्वधर्मिय विवाह मेळावे घेतले आहेत. अशा अनेक विवाह मेळाव्याची परंपरा सातत्याने आर्णी तालुक्याने जपली आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Tradition of wedding rally in Arni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.