पुसद शहरात वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:40 AM2021-03-25T04:40:24+5:302021-03-25T04:40:24+5:30
पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली ...
पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरामधील मुख्य बाजारपेठेमधील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नेहमीच पाहावयास मिळत आहे. शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
शहरातील वाहतुकीचे प्रमुख रस्ते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक, सुभाष चौक या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीस व रहदारीला अडथळा येत आहे. सामान्य नागरिक, अबालवृद्ध, महिला, शाळकरी मुली आदींना या मार्गावरून पायी चालणे, दुचाकी चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. दररोज किरकोळ अपघात घडत आहे.
या रस्त्यावर नगरपरिषदेने खोदकाम व बांधकाम करून ठेवलेले आहे. त्यामुळे फुटपाथवर व्यवसाय करणारे, भाजीपाला, फळे विकणारे यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वास्तविक आता एका बाजूने जाणे व एका बाजूने येणे, अशा रस्त्याचे तेथे प्रयोजन आहे. परंतु दोन्ही बाजूला भाजीपाला, फळे विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी नेहमीच ग्राहक, दुुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने उभी करतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी संपवण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक या परिसरात कायम वाहतूक शिपायाची नेमणूक व्हावी, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.