पांढरकवडा शहरात वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:16+5:302021-09-12T04:48:16+5:30
वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. मात्र शहरातील काही अरुंद रस्ते, वाहनतळाची वानवा आणि सोयीसुविधांअभावी शहरातील वाहतूक ...
वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. मात्र शहरातील काही अरुंद रस्ते, वाहनतळाची वानवा आणि सोयीसुविधांअभावी शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. शहरात विविध शासकीय कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दवाखाने, विविध दुकाने आदी परिसरात वाहने उभी केली जातात. जड वाहनांसह ऑटो व दुचाकी भर रस्त्यावर उभी केली जातात. शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यावर नव्याने येणारी वाहने वाढत असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहनाची प्रचंड कोंडी होते. शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून पांढरकवडा शहरात येणारे नागरिक आपली वाहने जागा मिळेल त्याठिकाणी उभी करत असल्याने वाहनांच्या चोरी होण्याचे, वाहनातून पेट्रोल काढण्याचे प्रकार वाढत चालले आहे. यासोबतच पंचायत समिती परिसर, तहसील चौक, विविध बँकांचा परिसर, दवाखाने परिसरात वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केलेली असतात. याठिकाणी प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना जाण्यासाठी रस्ता शोधावा लागतो. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देऊन अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.