वाहतूक शाखेतील दंडाच्या रकमेत अपहाराचा संशय
By admin | Published: February 25, 2015 02:16 AM2015-02-25T02:16:12+5:302015-02-25T02:16:12+5:30
जिल्हा वाहतूक शाखेत वाहनधारकांकडून वसूल होणाऱ्या रकमेपैकी अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रकमेचा अपहार होत असल्याचा संशय आहे.
यवतमाळ : जिल्हा वाहतूक शाखेत वाहनधारकांकडून वसूल होणाऱ्या रकमेपैकी अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रकमेचा अपहार होत असल्याचा संशय आहे. कारण रक्कम घेऊनही ती चलानवर नमूद न करता चक्क वाहनधारकांना कोरे चलान दिले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
घाटंजी तालुक्याच्या सायखेडा येथील विलास महादेव भुरके (५५) हे शेतकरी आपल्या एम.एच.२९-एओ-१८८७ या पॅशन प्रो गाडीने सोमवारी २३ फेब्रुवारीला यवतमाळात आले होते. गोदनी रोडवर जात असताना जाजू चौकात एका वाहतूक पोलीस शिपायाने त्यांना अडविले. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. मात्र आरसी बूक सोबत नव्हते. म्हणून त्यांच्याकडून २०० रुपये घेतले व चलानही दिले.
मात्र या रकमेची चलानवर नोंदच नव्हती. अखेर हे कोरे चलान घेऊन (रक्कम नमूद नसलेले) भुरके यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत ‘लोकमत’ कार्यालय गाठले. हे चलान पाहून धक्काच बसला. २०० रुपये घेऊन प्रत्यक्षात त्यातील १०० रुपयेच रेकॉर्डवर नमूद केले जात असावे, उर्वरित १०० रुपयांचा सदर वाहतूक पोलीस शिपायाने अपहार केला असावा, असा संशय या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात वाहतूक शाखेचे १६४ पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण, वाहनांच्या तपासणीसाठी दरदिवशी तैनात असतात. एका दिवशी ते डझनावर वाहनांचे चलान फाडतात. तसे टार्गेटच त्यांना दिले जाते. वाहनधारकांना चलान दिले जाते मात्र या सर्व प्रकरणात अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रक्कम हडपली जात असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
एक तर वाहतूक पोलीस अर्ध्या अधिक वाहनांना चलान देत नाही, चिरीमिरी करून वाहने सोडली जातात. आता तर चक्क चलानवर रक्कम नमूद न करता कोरे चलान वाहनधारकांना देण्याचे धक्कादायक प्रकारही पुढे आले आहे.
चलान न देता आणि चलान देऊन त्यातील अर्धी रक्कम हडपणे अशा दोन प्रकारातून जिल्हा वाहतूक पोलीस शाखेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गोंधळ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘लोकमत’च्या हाती लागलेले कोरे चलान हा एक सबळ पुरावा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चलान बुकांचे स्पेशल आॅडिट केल्यास तेथील मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)