तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:55 PM2018-12-14T23:55:46+5:302018-12-14T23:57:00+5:30
मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. या तस्करांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वणी उपविभागातील पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
काही महिन्यांपूर्वी जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेली जायची. त्यामुळे अनेकदा या तस्करांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. तस्करीचे मुख्य केंद्र हे नागपूर असल्याने नागपुरात जनावरांना ट्रकमध्ये कोंबून वणीमार्गे ही जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जायची. परंतु पोलिसांनी तस्करांविरूद्ध कारवाईचा फास आवळल्याने या मार्गाने ट्रकने जनावरे नेण्याचा प्रकार काहीअंशी बंद झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी यावर मात करण्यासाठी तस्करांनी नवा फंडा अवलंबविला आहे. झरीच्या जंगलात जनावरे एकत्र करायची. त्यानंतर १० जनावरांच्यामागे एक मजूर लावून त्या जनावरांना चोरट्या जंगल मार्गाने तेलंगणात पोहोचते करायचे. असा नवा फंडा या तस्करांनी अवलंबविला आहे. एक माणुस १० जनावरे घेऊन जात असल्याने तो गुराखीच असावा, असे पाहणाऱ्याला वाटते. त्यामुळे ही तस्करी यशस्वी होऊ लागली आहे. या तस्करीत वणी उपविभागातील अनेक लोक गुंतले असून तेलंगणातील तस्करांशी त्यांचा दैनंदिन व्यवहार असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.
रस्त्याने १० जनावरे घेऊन जाणाºया व्यक्तीचा कुणालाच संशय येत नसल्याने तो व्यक्ती ही जनावरे घेऊन सहीसलामत तेलंगणात पोहोचत आहे. तेलंगणातील काही तस्कर एजंटांच्या माध्यमातून सिमेवरील गावातून जनावरांची कमी पैशात खरेदी करून ती कत्तलीसाठी घेऊन जात आहेत.
जनावरे हाकत नेणाºया मजुराला रग्गड मजुरी दिली जात असल्याने तोदेखिल निडरपणे तस्करीतील ही जनावरे तेलंगणात पोहोचवित आहे. या धंद्यात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. झरी तालुक्यातील पाटण येथे पोलीस ठाणे आहे. मात्र पाटण पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दिवसाढवळ्या ही तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीचे तार मारेगावातही जुळले असल्याचे सांगितले जाते. मारेगाव आणि झरी तालुके अगदी जवळ आहेत.
चारा टंचाईमुळे ग्रामीण भागात जनावरे विक्रीला
यंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच पाऊस कमी झाल्याने आगामी काळात चाºयाची टंचाई जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी आपले गोधन विक्रीला काढले आहे. तस्कर ते गोधन अल्प किमतीत खरेदी करीत आहेत.