निवडणुकीत शेतापर्यंत येतात गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:43 PM2019-03-07T22:43:59+5:302019-03-07T22:44:29+5:30
पाच वर्ष जनता कोणत्या अवस्थेत आहे याचे कोणत्याच राजकारण्याला सोयरसूतक नसते. परंतु निवडणुका आल्या की, मतांसाठी ही मंडळी घरापर्यंतच नव्हे तर शेतापर्यंत येऊन मतदानाला नेतात, अशी खंत महिलांनी व्यक्त केली.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाच वर्ष जनता कोणत्या अवस्थेत आहे याचे कोणत्याच राजकारण्याला सोयरसूतक नसते. परंतु निवडणुका आल्या की, मतांसाठी ही मंडळी घरापर्यंतच नव्हे तर शेतापर्यंत येऊन मतदानाला नेतात, अशी खंत महिलांनी व्यक्त केली. शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने सदर प्रतिनिधीने काही ग्रामीण महिलांशी संवाद साधला असता मतांच्या राजकारणाचे वेगळेच चित्र पुढे आले.
मतंय द्यावं नाई वाटत गा!
आमच्या गावातंच का कोन्याबी गावात ह्येच चालू हाये. पाच वर्सं आमी काय मोलमजुऱ्या करतो, कोनाले कायी घेनं देनं राह्यत नाई. पण विलेक्शन आलं तं घरापतूर का वावरावरी गाड्या घेऊन येते लोकं. कसंई कर पण मत्दानाले ये म्हून पाया पडते. माहावालं नाई मनत पण बाकीच्या बायायचं सांगतो. कोणी यॅटो करून नेलं का बाया नरमते, थो मनन त्याचंच बटन मारते... रुक्मा विठ्ठल कारसरपे ही वृद्धा खेड्यातल्या व्होटींगची खरी कहाणी सांगत होती. तळेगाव वाकी या आपल्या गावाविषयी ती म्हणते, येका येका घरी चार चार संडास देल्ले नं एखांद्या घरी येकबी नाई देत. आसे हे राजकारणी हायेतं. इलेक्शनच्या राती गावात कोणी तरी येते, मेन मानूस पाहून पैशाची पेटी देऊन जाते. थो काय करते तं पैसा सोताच ठेवून घेते. नं आमच्या दाठ्ठ्यात हात जोडत येते, अमक्यालेच मतं द्या म्हून सांगते. हे सबन पाह्यलं मतंय द्यावं नाई वाटत गा. मी म्हणतो का तुमी जाण्या-येण्याचे, फराळपाण्याचे ठेवून घ्या. लोकायले कायले वाट्टा भिकाºयावानी? पैसे बी तुमीच घ्या आन तुमीच उभे राहा, तुमीच मतं टाका... तळेगावच्या रुक्माबाईचा हा तळतळाट म्हणजे महिलांच्या मतांच्या अपहरणाचे जिवंत उदाहरण.
बचतगटांचा गठ्ठा
ग्रामीण भागात महिला बचतगटांमुळे महिला संघटित झाल्या खऱ्या. पण त्यांच्या समन्वयाचे काम एखाद्या पुरुषाकडे आहे. निवडणुकीच्या वेळी हा पुरुषच गटाच्या सर्व महिलांची मते आपल्या मतानुसार वळवितो. त्यावरच चिचगावच्या (ता. नेर) नलू ठाकरे बोट ठेवतात. नलू ठाकरे म्हणाल्या, ‘गटाच्या बायायले पह्यलेच सांगून राह्यते कोनाले मत टाकाचं थे. आता आमी बाया दारुबंदीत हावो. गावात दारूबंदी केली. कुठंबी मोर्चा राहो, मी माह्या पैशानं जातो. आमाले समजते मत कोनाले द्याचं थे. पण येकांद्यानं का यॅटो आनला, का लई जनीचे मतं पलट्टे.’
पेणाऱ्याले दारू, घेणाऱ्याले पैसे भेट्टे
घारेफळच्या (ता.नेर) शशिकला राऊत म्हणाल्या, पैसेवाल्याले पैसेवाला इचारते. मद्दानाच्या टाईमले गावात पेणाऱ्यायले दारू भेट्टे, घेणाऱ्याले पैसे भेट्टे. खेड्यायनं आशी परंपरास चाल्ली हाये. बायायले थे काईच नाई पायजे. घेणारा माणूस पैसे खावून घेते नं मंग आमच्या बायायले सांगते तमक्याले अजिबात मत द्याचं नाई का ढमक्याचं काम बराबर नाई. येकडाव इलेक्शन झालं का मंग कारं कुत्रं इचारत नाई. कवा कवा वाट्टे मताले जाचं तरी कायले? पन आपल्याले अधिकार देल्ला हाय तं जा लागते.
गरिबायचं चालते तरी का?
चिकणी डोमगा या गावातील अंजनाबाई कोंडबाजी ठाकरे म्हणाल्या, ‘गावात निवडणूक कोणतीय राहो, आमाले पयले आडर राह्यते... फलाना कामाचा हाये, त्यालेच टाकजो मत. जवा मतदानाचा दिस येते तवा आमच्यासाठी यॅटो येते, जिपगाडी येते नाईस काई आलं तं कोनाचं ना कोनाचं खासर जुतून येते. कसंयी करून आमाले मताले नेते. कोनी नेते म्हून आमी जातो. पन तिथीसा गेल्यावर आमी काय करतो हे कोनाले सांगून का कराचं हाये?’
पुरुषी मताचे मूल्य वाढले, महिलांचे मत शून्य
राज्यघटनेने महिला आणि पुरुष या दोघांच्याही मताला सारखे मूल्य दिले आहे. पण आज प्रत्यक्षात महिलांच्या मताचे मूल्य शून्य केले जात आहे. घरातला पुरुष महिलांच्या मतांवर प्रभाव टाकतो. घरातली आई, बहीण, बायको या तिघींच्या हाताने पुरुषच मतदान करतो. पुरुष मतदान यंत्रात टाकतो, ते त्याचेच मत असते. पण अनेक महिला आपले म्हणून पुरुषाचे मत दान करते. त्यामुळे खेड्यातल्या एकेका पुरुषाच्या मताचे मूल्य दोन-तीन झाले आहे. तर महिलांच्या मताचे मूल्य शून्य होत आहे. मतदान यंत्राला फक्त दाबलेली बटन कळते. बटन दाबणाऱ्याच्या मनातले कळत नाही.