झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला; पहिल्याच दिवशी सहा विभागातील ४१ जणांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 01:54 PM2022-05-10T13:54:04+5:302022-05-10T14:00:27+5:30
मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.
यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सहा विभागांतील ४१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, ३१ मेपूर्वी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध विभागांतील बदल्यांसाठी ९ ते ११ मे पर्यंत तारीख ठरवून दिली आहे. संबंधित तारखेला त्या विभागातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली केली जाणार आहे. सर्व बदल्या समुपदेशनाने केल्या जात आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील तीन वरिष्ठ सहायकांची प्रशासकीय, तर एकाची विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन विनंती बदल्या, तर कनिष्ठ सहायकांच्या १३ प्रशासकीय, तर सहाजणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.
सिंचन विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंती, तर महिला व बालकल्याण विभागातील चार पर्यवेक्षिकांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. कृषी विस्तार अधिकाऱ्याची एक प्रशासकीय, तर दोन विनंती बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंतीवरून, तर दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची प्रशासकीय आणि तिघांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. सोमवारी पाच विभागांतील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, तर २० कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.
प्रतिनियुक्तीसाठी अनेकांनी लावली फिल्डिंग
काही विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्या झाल्या; मात्र त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्तच केले नाही. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोनदा त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यालाही विभागप्रमुखांनी खो दिला. सामान्य बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी यापैकी काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले; मात्र आता त्यापैकी काही कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीच्या नावाखाली संबंधित विभागात परत येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.
शिक्षक बदल्यांकडे लक्ष
गेल्या चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. कोरोनामुळे या बदल्या रखडल्या होत्या. आता शासनाने ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास आठ हजार शिक्षकांचे बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
१६ मे पासून पंचायत समिती स्तरावर प्रक्रिया
जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ११ मे पर्यंत केल्या जाणार आहेत. ११ मे रोजी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर १६ मे पासून तालुकास्तरावर पंचायत समितीअंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत.