अखेर मुख्याधिकारी माधुरी मडावींची बदली; दादाराव डोल्हारकर नवे सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 04:30 PM2022-09-21T16:30:19+5:302022-09-21T16:35:48+5:30

मडावी यांची अमरावती येथे सहायक आयुक्तपदी बदली

Transfer of Yavatmal Nagar Parishad Chief Madhuri Madavi, Dadarao Dolharkar is the new CEO | अखेर मुख्याधिकारी माधुरी मडावींची बदली; दादाराव डोल्हारकर नवे सीईओ

अखेर मुख्याधिकारी माधुरी मडावींची बदली; दादाराव डोल्हारकर नवे सीईओ

googlenewsNext

यवतमाळ : येथील नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची राजकीय द्वेषातून बदली केली जात असल्याची चर्चा मागील आठवडाभरापासून सुरू होती. ही बदली रद्द व्हावी, यासाठी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व यवतमाळकर जनतेने विविधप्रकारची आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने बदली रद्द व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची नाराजी माधुरी मडावींना भोवली. मंगळवारी सायंकाळी मडावी यांच्या बदलीचा आदेश धडकला. त्यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कारंजा येथील मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांंना नियुक्ती देण्यात आली.

माधुरी मडावी यांना बदलीनंतर नवीन ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे निर्देश आदेशातून देण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) यातील तरतुदीनुसार केली आहे. त्यांना बदली आदेशातूनच पदावरून कार्यमुक्तही केले आहे. बुधवारी सहायक आयुक्त पदावर रुजू होऊन आदेशाचा अनुपालन अहवाल राज्य शासनाला सादर करावयाचा आहे.

मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; सूड भावनेने केलेली बदली रद्द करण्याची मागणी

बदलीने रिक्त झालेल्या मुख्याधिकारी पदासाठी सध्या कुणाची नियुक्ती झाली, याचा आदेश आलेला नाही. मडावी यांच्या जागेवर कोण येणार, याची चर्चा सुरू आहे. चर्चेतील पाच नावांपैकी कुणावर शिक्कामोर्तब होतो, याकडे लक्ष लागले आहे. 

प्रशासनाने जनमाणसाच्याविरोधात कौल दिला आहे. यवतमाळकर जनतेने माधुरी मडावींना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ठेवावे, यासाठी आंदोलने उभारली. सातत्याने सात दिवसांपासून धरणे, मोर्चा, समाधी आंदोलन, आत्मदहन इशारा अशी आंदोलने सुरू आहेत. याची दखल शासन स्तरावर घेतल्या गेली नाही. उलट माधुरी मडावी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींची असलेली नाराजी भारी पडली. त्यांना मुदतपूर्वच बदलीला सामोरे जावे लागले आहे.

एक वर्षाच्या कार्यकाळात शहराचा कायापालट

माधुरी मडावी या मुख्याधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी रुजू झाल्या. येथे आल्यानंतर तीन महिन्यांत त्यांची अ दर्जाच्या मुख्याधिकारी म्हणून पदोन्नती झाली. यवतमाळ शहरासह नगरपरिषदेतील प्रशासनाची विस्कटलेली घडी मडावी यांनी पूर्वपदावर आणली. महत्त्वाची बाब म्हणजे २००३ पासून निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या नाट्यगृहाची समस्या निकाली काढली, नाट्यगृहाचे काम मिनश मोडवर घेऊन आता अंतिम टप्प्यात आणले, शहरातील कचरा संकलन, नाले सफाई, सौंदर्यीकरण, मालमत्ता कर वसुली या सर्व कामांचे विक्रम त्यांनी प्रस्थापित केले, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक नगरभवनाला वस्तू संग्रहालयाचे स्वरूप दिले, शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरवासाठी चौका-चौकाला नाव दिले. प्रमुख नऊ चौकांचे सुशोभिकरण सुरू केले, अतिक्रमित रस्ते मोकळे केले, स्वत: उभे राहून नाल्यांची सफाई करवून घेतली.

मडावींचा असा होता दिनक्रम...

नगरपरिषदेतील सफाईची यंत्रणा सुधारण्यासाठी त्या स्वत: सकाळी ६ वाजता सफाई कामगारांची हजेरी घेत होत्या. कामचुकार व धनदांडग्या सफाई कामगारांना त्यांनी हातात झाडू घेण्यास भाग पाडले. व्यापारी वर्गाकडून रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कारवाई केली. यातून एक शिस्त लागली. कार्यालयीन वेळेत पालिका कर्मचारी उपलब्ध होऊ लागले. प्रत्येक निर्णय तातडीने होऊ लागला. सकाळी ६ वाजता घराबाहेर पडलेल्या माधुरी मडावी रात्री उशिरापर्यंत पालिकेत बसून काम करीत होत्या. अत्यावश्यक सेवा असल्याने शनिवार-रविवारच्या सुट्याही त्यांनी टाळल्या. श्रमदानातून अनेक कामे करून घेतली. कर्मचारी वर्गाचा त्यांना पाठिंबा मिळाला. न भूतो न भविष्यती असा क्रीडा महाेत्सवही घेतला.

Web Title: Transfer of Yavatmal Nagar Parishad Chief Madhuri Madavi, Dadarao Dolharkar is the new CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.