बदल्या झाल्या, पण कार्यमुक्ती अद्याप अडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:13+5:30
एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद प्रशासनाने नुकत्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत केवळ मोजकेच कर्मचारी कार्यमुक्त झाले असून उर्वरितांनी अद्यापही जुन्याच विभागात मुक्काम ठोकला आहे.
कोरोनामुळे यावर्षी बदल्या लांबल्या होत्या. मात्र शासन निर्देशानुसार गेल्या महिन्यात एकदाच्या बदल्या आटोपल्या. सर्वसाधारण बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. शासनाने प्रशासकीय व विनंती अशा प्रत्येकी ७.५ टक्के बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ वर्षे एकाच ठिकाणी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली गेल्याचे सांगितले जाते. अनेक कर्मचाऱ्यांनीही त्याताबाबत समाधान व्यक्त केले. नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पाडली.
याचवेळी एकाच विभागात पाच वर्षे सेवा झालेल्या लिपीकवर्गीय आणि लेखावर्गीय कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, बांधकाम, सिंचन, शिक्षण, पाणीपुरवठा, वित्त, समाजकल्याण आदी विभागात पाच वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या यात समावेश आहे. एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
काही विभाग प्रमुख आधी आपल्या विभागात बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू होऊ द्या, नंतरच तुम्हाला कार्यमुक्त करू, असे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सांगत आहे. यामुळे बदली झालेले कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आपला जुना विभाग सोडवेनासा झाला आहे. तेथे त्यांचे हितसंबंध गुरफटलेले आहे. विशेष म्हणजे काही पदाधिकारीच बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना विभागातून जाऊ देण्यास तयार नाही, तर काहींना त्या विभागात येऊ देण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते.
सीईओंच्या भूमिकेकडे कर्मचाºयांचे लक्ष
बदली झालेल्या अनेक कर्मचारी नवीन विभागाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागातील मोजक्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. सामान्य प्रशासन, वित्तसह अनेक विभागातील कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहे. यात नेमके कुणाचे हितसंबंध जुळले असावे, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच ‘खमकी’ भूमिका घेऊन बदली झालेल्या सर्व कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे जवळपास ५0 कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. अनेक कर्मचारी कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी रुजू झाले. तथापि सोमवार, ७ सप्टेंबरला याबाबत सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेणार आहे.
- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, यवतमाळ